Join us  

मुंबईतील सुमारे आठ हजार इमारती आहेत प्रतिबंधित ; महापालिकेची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 6:45 AM

मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रसार सुरू झाला, तेव्हा चाळी आणि झोपडपट्ट्यांमध्ये रुग्णांचे प्रमाण अधिक होते. मात्र गेल्या महिनाभरात इमारतींमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येत आहे.

मुंबई : गेल्या महिन्याभरात मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३४ टक्क्यांनी वाढली आहे. यापैकी बहुतांश रुग्ण इमारतींमधील रहिवासी असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे प्रतिबंधित इमारतींचे प्रमाणही ५३ टक्क्यांनी वाढले आहे. आॅगस्टमध्ये मुंबईत सील इमारतींची संख्या ६१७१ होती. मात्र सद्यस्थितीत सील इमारतींची संख्या ८७६३ झाली आहे.मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रसार सुरू झाला, तेव्हा चाळी आणि झोपडपट्ट्यांमध्ये रुग्णांचे प्रमाण अधिक होते. मात्र गेल्या महिनाभरात इमारतींमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बाधित रुग्ण सापडलेला मजला केवळ सील करण्याचा नियम रद्द करण्यात आला आहे. त्याऐवजी आता दहा व त्यापेक्षा अधिक रुग्ण एखाद्या इमारतीमध्ये आढळून आल्यास संपूर्ण इमारत सील करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. परिणामी, मुंबईत सील इमारतींची संख्या पुन्हा वाढू लागली आहे.गेल्या महिन्याभरात महापालिका दररोज सरासरी शंभर इमारती सील करीत आहे. बोरीवली, मालाड, अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरी आणि भांडुप या विभागांमध्ये दररोज सरासरी शंभर रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे या विभागातील प्रतिबंधित इमारतींची संख्याही अधिकआहे.आर मध्य म्हणजे बोरीवलीत सर्वाधिक १२२९ इमारती सील आहेत. त्यापाठोपाठ आर दक्षिण म्हणजे कांदिवली आणि के पश्चिम (अंधेरी, जोगेश्वरी) या विभागात ६५० इमारती सील आहेत.- लॉकडाऊनच्या काळात गृहनिर्माण सोसायट्यांमधील रहिवासी घराबाहेर पडण्याचे प्रमाण अत्यल्प होते. मात्र आता लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर नोकरीधंद्यानिमित्त बहुतांश रहिवासी बाहेर पडत आहेत. त्यामुळे इमारतींमधील कोरोनाचा प्रसार वाढला आहे. असा अंदाज पालिका अधिकारी व्यक्त करीत आहेत.- सील केलेल्या इमारतीत किंवा इमारतीच्या भागात बाहेरील व्यक्तीला, फेरीवाल्यांना आत प्रवेश दिला जाणार नाही. केवळ वैद्यकीय कारणासाठी या ठिकाणच्या रहिवाशांना बाहेर जात येईल. सील इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांच्या अत्यावश्यक गरजा भागविण्यासाठी, क्वारंटाइन असणाऱ्यांच्या अत्यावश्यक गरजा, किराणा माल, दैनंदिन साहित्य यासाठी सोसायटीने समन्वयाने नियोजन करावे. कोणतीही लक्षणे असल्यास पालिकेशी संपर्क साधावा, अशी सूचना पालिकेने केली आहे.- आॅगस्टमध्ये मुंबईत सील इमारतींची संख्या ६१७१ होती. मात्र सद्यस्थितीत सील इमारतींची संख्या ८७६३ झाली आहे. आॅगस्टच्या तुलनेत सील इमारतींची संख्या तब्बल अडीच हजारांनी वाढली आहे. तर बाधित क्षेत्रांची संख्या ५६७ वरून ५९२ वर गेली आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस