Join us

कोरोनामुक्त झाल्यानंतर ३० टक्के रुग्णांना स्थूलपणाच्या तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई - कोरोनाचा संसर्ग झालेले अनेक रुग्ण उपचारानंतर बरे होऊन सुखरूप घरी परतले आहेत; पण कोरोनातून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई - कोरोनाचा संसर्ग झालेले अनेक रुग्ण उपचारानंतर बरे होऊन सुखरूप घरी परतले आहेत; पण कोरोनातून मुक्त झालेल्या अनेक रुग्णांमध्ये विविध शारीरिक आजार बळावत असल्याचे चित्र आहे. पालिका रुग्णालयांसह कोविड केंद्रांमध्ये सुरू केलेल्या पोस्ट कोरोना बाह्यरुग्ण विभागात ३० टक्के रुग्णांना लठ्ठपणाच्या तक्रारी भासत असल्याचे सांगितले आहे.

कोरोनाच्या संसर्गाचा धोका अतिजोखमीचे आजार असलेल्यांना अधिक आहे. त्यामुळे अशा व्यक्तींना संसर्ग झाल्यास उपचार प्रक्रियेत असताना अधिक गुंतागुंत जाणवू शकते. परिणामी, कोरोनामुक्तीनंतर या रुग्णांना अधिक काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले आहे. शारीरिक स्थूलता किंवा लठ्ठपणामुळे व्यक्तीला एकापेक्षा अधिक जीवनशैलीशी निगडित आजार असतात. तसेच तिला श्वसनालाही त्रास होतो, अशी माहिती बेरिएट्रीक सर्जन डॉ. नयन तेलंग यांनी सांगितले. त्यामुळे अशा रुग्णांनी कोरोनानंतर आहाराचे नियोजन, पौष्टिक आहार, वेळा, व्यायाम यावर अधिक लक्ष दिले पाहिजे. याशिवाय, वैद्यकीय सल्ल्याशिवाय कोणतीही जोडऔषधे वा अधिकच्या औषधांचे सेवन करू नये, असेही डॉक्टरांनी नमूद केले.

--------

ओटीपोटीची चरबी छातीच्या पोकळीत ढकलली जाते, पर्यायाने फुफ्फुसांवर ताण येतो आणि नलिकेतील वायुप्रवाहाला अडथळा निर्माण होतो. तसेच, श्वासोच्छ्वासासाठी येणाऱ्या रक्ताचे प्रमाणही वाढते. स्थूलतेमुळे व्यक्तीतील रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. चरबीमुळे विविध अवयवांच्या कार्यक्षमतेवर विपरित परिणाम झालेला असतो. पर्यायाने त्यांच्यामध्ये जीवनशैली विकारांचे प्रमाण अधिक असते. कोरोनाच्या उपचारांवेळी अत्यवस्थ रुग्णांवर उपचार करताना क्लिष्टता अधिक वाढण्याची शक्यता असते, अशी माहिती पोस्ट कोविड विभागातील डॉ. हिमांशू तारवाला यांनी दिली आहे.

स्थूलतेची समस्या असल्यास हे करा

* स्थूलतेची समस्या असणाऱ्यांनी प्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यायाम करावा

* श्वास घेण्यास त्रास जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

* जीवनशैलीशी निगडित आजारांचे निदान करण्यासाठी योग्य वेळी तपासण्या व निदान करावे