Join us  

१,३३७ कोटी खर्च झाले की गर्दी कमी होणार; फलाटांच्या रुंदीकरणाला वेग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2024 10:54 AM

मध्य रेल्वेच्या दादर येथील रेल्वेस्थानकातील फलाटाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आल्याने गर्दीचा ताण कमी होईल, असा दावा करण्यात आला आहे.

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील रेल्वेस्थानकांच्या फलटांच्या रुंदीकरणासाठी हाती घेण्यात आलेल्या कामांनी वेग पकडला असून, मध्य रेल्वेच्या दादर येथील रेल्वेस्थानकातील फलाटाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आल्याने गर्दीचा ताण कमी होईल, असा दावा करण्यात आला आहे. तर फलाट क्रमांक ८ रुंद करण्यात आला असून, येथील गर्दी पसरत असल्याने प्रवाशांना दिलासा मिळत आहे. सीएसएमटी-परळ या पाचव्या-सहाव्या मार्गिकेसाठी भूसंपादन सुरू केले जाणार असून, कुर्ला ते सीएसएमटी या पाचव्या-सहाव्या मार्गिकेच्या कामाचा खर्च १,३३७ कोटी रुपये आहे.

मध्य रेल्वेच्या फलाट क्रमांक १० आणि फलाट क्रमांक ११ मधील लोखंडी-लाकडी कुंपण काढण्यासह उर्वरित बांधकाम तोडून नव्याने काम सुरू करण्यात आले आहे. फलाट क्रमांक १० वर डाऊन मार्गावर जाणाऱ्या जलद लोकल थांबतात. ऐन पीक अवरला या फलाटावर लोकलमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी होते. ही गर्दी कमी करता यावी म्हणून दोन टप्प्यांत काम हाती घेण्यात आले आहे.

फलाट क्रमांक ८ :  मध्य रेल्वेने फलाट क्रमांक ८ चे कामही वेगाने हाती घेतले आहे. हा फलाट रुंद करण्यासाठी काम सुरू असून, आता लोकल प्रवाशांना उभे राहण्यासाठी पुरेशी जागा असल्याने फलाटावरील गर्दी कमी होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, येथे उतरणारे जिने मात्र अरुंद आहेत. त्यामुळे पीक अवरला जिन्यांवरील गर्दी कायम असल्याचे चित्र दिसते.

परळ ते सीएसएमटी भूसंपादन अडचणीत :

१) लोकलने ७५ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात.

२) प्रवाशांचा प्रवास वेगवान व्हावा म्हणून पाचवी व सहावी मार्गिका टाकण्यात येत आहे.

३) सीएसएमटी ते परळ आणि परळ ते कुर्ला अशी ही पाचवी-सहावी मार्गिका आहे.

४) कुर्ला ते परळदरम्यानच्या भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लागत आहे.

५) परळ ते सीएसएमटीदरम्यानचे भूसंपादन अडचणीत आहे.

आणखी एक पर्याय उपलब्ध :

१) सीएसएमटी ते कुर्ल्यापर्यंत एकूण चार मार्गिका आहेत.

२) पहिल्या आणि दुसऱ्या मार्गिकेवरून धीम्या गाड्या धावतात.

३) तिसऱ्या, चौथ्या मार्गिकेवरून जलद गाड्या धावतात.

४) पाचवी, सहावी मार्गिका वाढली तर आणखी एक पर्याय उपलब्ध होईल आणि लोकलचा वेग वाढेल.

टॅग्स :मुंबईमध्य रेल्वे