Join us  

अंधेरीतील व्यापा-याचे ८२ लाखांच्या खंडणीसाठी अपहरण, सहा जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2017 4:39 AM

एका व्यापा-याचे अपहरण करीत ‘तुम्हारा पती हमारे कब्जे मे है, अगर उसकी सलामती चाहती हो ८२ लाख हमे दे दो,’ असे तिच्या पत्नीला धमकाविणा-या सहा जणांच्या टोळीला अंबोली पोलिसांनी ७२ तासांत अटक करीत व्यापा-याची सुखरूप सुटका केली.

मुंबई : एका व्यापा-याचे अपहरण करीत ‘तुम्हारा पती हमारे कब्जे मे है, अगर उसकी सलामती चाहती हो ८२ लाख हमे दे दो,’ असे तिच्या पत्नीला धमकाविणा-या सहा जणांच्या टोळीला अंबोली पोलिसांनी ७२ तासांत अटक करीत व्यापा-याची सुखरूप सुटका केली. महमद शेख (३६), संदीप शर्मा (३८), चंद्रभान सिंग उर्फ उधम (३२), अनिल पांडे (३३), धीरज सिंग (२५) व महमद कबाडी (३२) अशी त्यांची नावे आहेत. सर्व जण नालासोपारा परिसरात राहत असून, त्यांना १३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.अंधेरीतील भावीन शाह (३९) हे ३१ आॅक्टोबरला कामानिमित्त अंधेरी प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयात गेले होते. दुपारी ३पर्यंत परत येत असल्याचे त्यांनी पत्नी हेतल यांना सांगितले होते, मात्र रात्री ९ वाजेपर्यंत ते न परतल्याने, तसेच त्यांचा मोबाइल फोनही बंद असल्याने हेतल यांनी अंबोली पोलीस ठाण्यात पती बेपत्ता असल्याबाबत तक्रार दाखल केली. त्यानंतर १ नोव्हेंबरला दुपारी भावीनच्या मोबाइल क्रमांकावरून त्यांना फोन आला. त्या वेळी मोबाइलवर एक व्हिडीओ क्लिप पाठवली असून ती बघून घ्या, असे समोरील व्यक्तीने हेतल यांना सांगितले. त्या क्लिपमध्ये भावीन हे गयावया करत आपले अपहरण झाले असून, अपहरणकर्त्यांना ८२ लाख रुपये खंडणी देण्याची विनंती करत होते. त्यानंतर त्यांच्या घरच्यांनी हा प्रकार अंबोली पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत गायकवाड यांच्या सूचनेनुसार या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक दया नायक व त्यांच्या पथकाकडे सोपविण्यात आला होता.नालासोपारामधून केली सुटकामुख्य म्हणजे या प्रकरणी कोणताच क्लू पोलिसांकडे नव्हता. कारण भावीन यांच्याच मोबाइलवरून व्हिडीओ क्लिप पाठवून तो बंद करण्यात येत होता आणि अपहरणकर्ते त्यांचे लोकेशन बदलत होते. पण साकीनाका, विरार, अंधेरी, वसई असा पाठलाग करत खंडणीचे पैसे घेण्यासाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून, नालासोपारा येथील फ्लॅटमधून भाविन यांची सुटका करीत अन्य चौघा अपहरणकर्त्यांना अटक केली.

टॅग्स :गुन्हा