Join us

आरेच्या समस्या लवकरच सुटणार

By admin | Updated: June 15, 2016 02:39 IST

आरे येथील विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी ‘लोकमत आपल्या दारी’चे आयोजन ४ जून रोजी येथील ‘नवक्षितिज चॅरिटेबल’चे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सुनील कुमरे यांच्या

- मनोहर कुंभेजकर, मुंबई

आरे येथील विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी ‘लोकमत आपल्या दारी’चे आयोजन ४ जून रोजी येथील ‘नवक्षितिज चॅरिटेबल’चे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सुनील कुमरे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. ‘लोकमत’च्या या उपक्रमाला येथील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘लोकमत’ने आरेवासीयांच्या समस्या प्रभावीपणे मांडल्या. राज्यमंत्री आणि स्थानिक आमदार रवींद्र वायकर यांनीही बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिल्याचे सूत्रांनी सांगितले. ‘लोकमत’च्या दणक्यामुळे येथील वाहतूककोंडीची समस्या काही प्रमाणात कमी झाली आहे. या कार्यक्रमात जनतेने वाहतूककोंडीबद्दल आवाज उठवल्याप्रमाणे युनिट क्रमांक ५ येथे सायंकाळी रहदारीच्या वेळेत एक वाहतूक निरीक्षक आणि वाहतूक पोलीस तैनात करण्यात आला आहे. आरे प्रशासनाच्या ताब्यात असलेला युनिट १६ येथील आरे दवाखाना पालिकेकडे हस्तांतरित करण्याचा आदेश दुग्धविकास विभागाने ३ महिन्यांपूर्वी दिला. शासकीय आदेश निघूनसुद्धा अजूनही हा दवाखाना पालिकेकडे हस्तांतरित झालेला नसल्याचे कुमरे यांनी ‘लोकमत’च्या कार्यक्रमात स्पष्ट केले होते. ३ वर्षांपूर्वी त्यांनी हे रुग्णालय पालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी उपोषणदेखील झाले होते. परिसरातील समस्या सुटण्यास सुरुवात झालेली असली तरी येथील वीज आणि पाणी या मूलभूत समस्या लवकर सुटल्या पाहिजेत, असे मत रहिवासी व्यक्त करत आहेत. परिसरातील सर्व नागरिकांनी ‘लोकमत’चे आभार मानले आहेत. ‘लोकमत’च्या वृताची दखल घेत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री आणि जोगेश्वरी (पूर्व) विधानसभेचे आमदार रवींद्र वायकर यांनी मंत्रालयातील दालनात संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची बैठक घेतली. या बैठकीत जोगेश्वरी विधानसभेच्या विविध प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा झाली. युनिट १६ येथील दवाखाना पालिकेकडे लवकर हस्तांतरित करण्याचे आदेश वायकर यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.‘लोकमत’च्या दणक्यामुळे वाहतूककोंडीची समस्या काही प्रमाणात कमी झाली आहे. जनतेने वाहतूककोंडीबद्दल आवाज उठवल्याप्रमाणे रहदारीच्या वेळेत एक वाहतूक निरीक्षक आणि वाहतूक पोलीस तैनात करण्यात आला आहे.