Join us

मेट्रो प्रकल्पासाठी आरे कॉलनीच्या वृक्षांचा बळी!

By admin | Updated: February 8, 2015 00:48 IST

मेट्रो-३ प्रकल्पासाठी गिरगावमधील इमारतींच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर आता गोरेगाव येथील आरे कॉलनीतील वृक्षही धोक्यात आले आहेत़

मुंबई : मेट्रो-३ प्रकल्पासाठी गिरगावमधील इमारतींच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर आता गोरेगाव येथील आरे कॉलनीतील वृक्षही धोक्यात आले आहेत़ मेट्रो प्रकल्पाच्या आगारासाठी येथील तब्बल दोन हजार ४४ वृक्ष हलविण्यात व २५४ वृक्ष तोडण्यात येणार आहेत़मेट्रो-३ प्रकल्प कुलाबा ते सांताक्रूझ यासाठी आरे कॉलनीत डेपो उभारण्यात येणार आहे़ मात्र या प्रकल्पाच्या मार्गात येथील वृक्ष बाधा ठरत असल्याने तब्बल २५४ वृक्षांची कत्तल करण्याचा प्रस्ताव पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीपुढे मंजुरीसाठी आला आहे़ दोन हजार ४४ वृक्षांच्या पुनर्रोपणाची तयारी दाखविण्यात आली आहे़मुंबईत काही मोजकेच हिरवे पट्टे शिल्लक राहिले आहेत़ यापैकी आरे कॉलनी एक आहे़ पालिकेच्या गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यात येथील काही वृक्ष बाधा ठरत होते़ मात्र यासाठी पालिकेने येथून उन्नत मार्गाचा पर्याय निवडला़ त्याचवेळी मेट्रोसाठी हे वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव आल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे़ या प्रस्तावाला आक्षेप घेणारे २६ अर्ज मुदतीनंतर आल्यामुळे सुनावणी न घेताच फेटाळण्यात आले आहेत़ (प्रतिनिधी)मेट्रो प्रकल्पांसाठी पािलकेने तब्बल १४ भूखंडांची अवघ्या एक रुपया नाममात्र दरामध्ये खैरात वाटली आहे़ मोक्याचे भूखंड कवडीमोल दामात भाड्याने देण्याच्या पालिकेच्या या भूमिकेला सुधार समिती सदस्यांनी विरोध दर्शविला होता़ मात्र मेट्रो जनतेच्या हितार्थ असल्याने या प्रस्तावाला गेल्या महिन्यात हिरवा कंदील दाखविण्यात आला होता़