Join us
Daily Top 2Weekly Top 5

आमिर खानचा सोशल मीडियाला रामराम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:06 IST

मुंबई : ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अशी ओळख असलेल्या आमिर खानने सोशल मीडियाला रामराम केला आहे. विशेष म्हणजे वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी ...

मुंबई : ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अशी ओळख असलेल्या आमिर खानने सोशल मीडियाला रामराम केला आहे. विशेष म्हणजे वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी त्याने ट्विटरवर ही घोषणा केली आहे.

१४ मार्चला आमिरने ५६ वा वाढदिवस साजरा केला. त्यानिमित्त त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. दरवर्षी आमिरच्या वाढदिवसाला चाहते त्याच्या घराबाहेर गर्दी करतात. आमिरने गच्चीतून हात दाखवत त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केल्यावर ते आपापल्या घरी निघून जातात. पण, यंदा कोरोनाने त्यांनाही निराश केले. मात्र आमिरने मात्र आपल्या एकाही चाहत्याला नाराज केले नाही. सोशल मीडियाद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येक चाहत्याला त्याने स्वत:हून रि-ट्विट करीत खूश केले. परंतु, हा आनंद काही तासांपुरता मर्यादित होता. कारण वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी त्याने सोशल मीडियाला रामराम करीत असल्याची घोषणा केली.

-----------------

काय म्हणाला आमिर...

“मित्रांनो, माझ्या वाढदिवसानिमित्त आपण जे शुभेच्छारूपी प्रेम दिले त्याबद्दल धन्यवाद! आज मी आपल्याला आणखी एक बातमी देऊ इच्छीतो. ती म्हणजे, सोशल मीडियावरील ही माझी शेवटी पोस्ट असेल. पण, यापुढेही आपला संवाद कायम राहील. ‘आमिर खान प्रोडक्शन’ या पेजवरून माझ्याविषयीची प्रत्येक माहिती वेळोवेळी आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल”