Join us

आदिशक्तीचा जागर सुरु

By admin | Updated: September 24, 2014 23:33 IST

पावसाळा सरतो आणि थंडीची चाहूल देत शरदाची नांदी लावत अश्विन मास अवतरतो. त्याच्या प्रारंभापासूनच नवरात्रोत्सवास सुरुवात होते.

जयंत धुळप, अलिबागपावसाळा सरतो आणि थंडीची चाहूल देत शरदाची नांदी लावत अश्विन मास अवतरतो. त्याच्या प्रारंभापासूनच नवरात्रोत्सवास सुरुवात होते. यंदा संपूर्ण रायगड जिल्ह्यात १,०५९ सार्वजनिक तर १९१ खाजगी अशा एकूण १,२५० दुर्गादेवींच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येत आहे. पारंपरिक पद्धतीनुसार जिल्ह्यात १६९ खाजगी तर १३५९ सार्वजनिक घटस्थापना जिल्ह्यात होत आहेत. या व्यतिरिक्त १६१ सार्वजनिक ठिकाणी व १५३ खाजगी ठिकाणी दुर्गादेवीच्या फोटोंची स्थापना करण्यात येत आहे.नवरात्रात पहिला घटस्थापनेचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी मातीच्या वेदीवर घटाच्यावर पसरलेल्या ताम्हणात कुलदेवतेच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करून घटाभोवती गहू, ज्वारी, मका असे धान्य पेरली जाते. घटाजवळ प्रज्वलित केलेला नंदादीप नऊ दिवस-रात्र सतत तेवत ठेवला जातो. यंदा राजकीय नवरात्रोत्सवांवर निवडणूक आयोगाच्या निरीक्षकांची करडी नजर आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युवावर्गाला आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांकडून गरबा नृत्यांबरोबरच आकर्षक बक्षिसांची लयलूट होण्याची शक्यता आहे. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा बंदोबस्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांनी दिली आहे.