Join us

मुंबई विमानतळावर ५ कोटी प्रवाशांची विक्रमी नोंद

By मनोज गडनीस | Updated: January 23, 2024 21:25 IST

- २०२३ च्या वर्षात विक्रमी प्रवाशांची नोंद

मुंबई- नुकत्याच सरलेल्या २०२३ च्या वर्षात मुंबईविमानतळ प्रशासनाने तब्बल ५ कोटी १५ लाख ८० हजार प्रवासी संख्या हाताळल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे. हा आजवरचा विक्रम ठरला आहे. २०१९ पूर्वी अर्थात लॉकडाऊनपूर्वीच्या प्रवासी संख्येच्या तुलनेत २०२३ मध्ये तब्बल ११० टक्क्यांनी वाढ नोंदली गेली आहे.

प्राप्त माहितीनुसार, गेल्यावर्षी मुंबई विमातळावरून झालेल्या विमान वाहतुकीमध्ये देखील २०२२ च्या तुलनेत २० टक्क्यांनी वाढ झाली असून एकूण ३ लाख ३४ हजार ३९१ विमानांची वाहतूक मुंबई विमानतळावरून झाली आहे. गेल्यावर्षी देशाच्या व जगातील विविध भागांतून एकूण २ कोटी ५४ लाख प्रवासी मुंबईत दाखल झाले होते. तर, २ कोटी ६१ लाख लोकांनी मुंबई विमानतळावरून विविध मार्गांवर उड्डाण केले.

देशांतर्गत मार्गावर मुंबई विमानतळावरून दिल्ली, बंगळुरू आणि चेन्नई या ठिकाणी सर्वाधिक प्रवाशांनी प्रवास केला. तर आंतरराष्ट्रीय मार्गांवर दुबई, लंडन आणि अबु धाबी येथे प्रवाशांनी उड्डाण केले. गेल्यावर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात सर्वाधिक प्रवासी मुंबई विमानतळ प्रशासनाने हाताळले. २५ नोव्हेंबर या दिवशी मुंबई विमानतळाने १ लाख ६७ हजार १३२ प्रवासी संख्या हाताळत एका दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवासी हाताळण्याचा आणखी एक विक्रम केला आहे.

 

टॅग्स :विमानतळमुंबई