Join us  

गोखले पुलाच्या कामावरच प्रश्नचिन्ह, स्थानिकांनी लिहिलं आयुक्तांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 9:53 AM

स्थानिकांनी लिहिले आयुक्तांना पत्र, ना पादचारी जिना, ना दुरुस्तीचे काम वेळेत.

मुंबई : पालिका प्रशासनाकडून अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसराला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले पुलाची एक बाजू सुरू करण्यासाठी आता २५ फेब्रुवारी, २०२४ चा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. येत्या २३ फेब्रुवारीपर्यंत मार्गिकेची लेन टेस्टिंग आणि अवजड वाहतुकीसाठी चाचणी पार पडेल, अशी माहिती ही पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मात्र, स्थानिकांनी प्रत्यक्ष पुलाच्या कामाला भेट दिली असता, त्यांनी कामाचा दर्जा आणि गतीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. 

गोखले पुलाची देखरेख व कामाच्या नियंत्रणासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती पालिकेकडून करण्यात आलेली नसल्याने, त्यांनी आयुक्तांना या संदर्भात पत्र लिहून तक्रार केली आहे. पूर्व-पश्चिम दिशेला जोडणारा पूल बंद झाल्याने अंधेरीतील वाहतूककोंडी वाढली आहे. प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी महापालिकेने यापूर्वी पुलाची एक बाजू खुली करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अनेक कारणांमुळे कामाला होत असलेल्या दिरंगाईमुळे अंधेरीतील स्थानिकांनी आयुक्तांना पत्र लिहिले आहे. गोखले पुलाच्या सुरू होणाऱ्या एका मार्गिकेची दुरुस्ती सद्यस्थितीत सुरू आहे. मात्र, या कामाला आणखी किती दिवस लागतील, याची माहिती पालिकेने द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. 

पुलाच्या मार्गिकेवरील विविध भागांचे अद्याप सिमेंटीकरण झाले नसून त्याला वेळ लागू शकतो. मग पालिका ही कामे केव्हा करणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. या शिवाय अंधेरी पश्चिमेला गोखले पुलावरून ये-जा करण्यासाठी पादचारी जिना प्रस्तावित करण्यात आला होता. मात्र, त्या संदर्भात कुठल्याच प्रकारच्या कामाची सुरुवात झालेली दिसत नसल्याची तक्रारी ही स्थानिकांनी पत्रात केली आहे. 

नागरिकांकडून पुन्हा एकदा मागणी :

गोखले पुलाचे काम चांगल्या गतीने सुरू असले, तरी पुलाच्या दैनंदिन कामाची महिती स्थानिक नागरिकांपर्यंत पोहोचवावी, अशी मागणी स्थानिक करत आहेत, शिवाय अजूनही पुलाची देखरेख व कामाच्या नियंत्रणासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती पालिकेकडून करण्यात आलेली नाही, ती लवकरात लवकर करावी, असे स्थानिक अधोरेखित करत आहेत. नागरिकांनी पुलाच्या नोंदविलेल्या आक्षेपांवर कार्यवाही करावी, असेही नमूद केले आहे.

कामाला सुरुवात नाही :

अंधेरीतील वाहतूककोंडी टाळण्यासाठी गोखले पुलाच्या पश्चिमेची बाजू ही बर्फीवाला फ्लायओव्हरशी जोडण्यात येणार आहे. मात्र, अद्याप या संदर्भात कोणत्याही कामाची सुरुवात का झालेली नाही, असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे, शिवाय दुसऱ्या तुळईचे काम केव्हा सुरू होणार याची माहिती पालिकेने द्यावी, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे. 

टॅग्स :मुंबईनगर पालिका