Join us  

संगीतातील दिग्गजांच्या 'आठवणींची सांगीतिक मैफल'; सांस्कृतिक विभागाच्या वतीने तीन दिवसीय संगीत सोहळ्याचे आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 3:57 PM

दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्र येथे २६ ते २८ मार्च या कालावधीत 'आठवणींची सांगीतिक मैफल' हा तीन दिवसीय कार्यक्रम सादर होणार आहे.

मुंबई :  गायिका पद्मश्री माणिक वर्मा, ज्येष्ठ गायक अभिनेते पं. राम मराठे, नाटककार-गीतकार-पत्रकार विद्याधर गोखले आणि हिंदुस्तानी ख्यालगायक पद्मभूषण पं. सी. आर. व्यास यांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या 'आठवणींची सांगीतिक मैफल' या तीन दिवसीय संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य आहे. 

दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्र येथे २६ ते २८ मार्च या कालावधीत 'आठवणींची सांगीतिक मैफल' हा तीन दिवसीय कार्यक्रम सादर होणार आहे. पं. राम मराठे, विद्याधर गोखले, पं. सी. आर. व्यास यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने या संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, याच संगीत महोत्सवामध्ये गायिका माणिक वर्मा यांच्या सांगीतिक प्रवासाचे दर्शन घडवणारा कार्यक्रमही सादर होणार आहे. २६ मार्चला सायंकाळी ५.३० वाजता 'हसले मनी चांदणे' हा माणिक वर्मांच्या गीतांवरील कार्यक्रम, २७ मार्चला सायंकाळी ४.३० वाजता पं. राम मराठे आणि नाटककार विद्याधर गोखले यांच्यावरील संयुक्त कार्यक्रम 'जय शंकरा-विद्याधरा' आणि २८ मार्चला सायंकाळी ५.३० वाजता पं. सी. आर. व्यास यांचे पुत्र गायक पं. सुहास व्यास यांच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम होणार आहे.

पं. राम मराठे यांचे पुत्र गायक अभिनेते मुकुंद मराठे, त्यांची कन्या अर्थातच पं. राम मराठे यांची नात गायिका अभिनेत्री स्वरांगी मराठे, गायक-अभिनेते ज्ञानेश पेंढारकर व अभिनेत्री नीलाक्षी पेंढारकर, पं. सी. आर. व्यास यांचे पुत्र शास्त्रीय गायक पं. सुहास व्यास, गायिका मधुरा कुंभार, केतकी चैतन्य आदी कलावंतांसह अमेय ठाकूरदेसाई, हनुमंत रावडे, सागर साठे, झंकार कानडे, धनंजय पुराणिक, मकरंद कुंडले, महेश कानोले, श्रीनिवास आचार्य ही वादक कलाकार मंडळी सहभागी होणार आहेत. आपल्या आई-वडीलांच्या आठवणी सांगण्यासाठी गायिका राणी वर्मा, पं. राम मराठे यांचे पुत्र मुकुंद मराठे आणि पं. सी. आर. व्यास यांचे पुत्र शशी व्यास तसेच संगीतकार कौशल इनामदारदेखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन अस्मिता पांडे, अमेय रानडे आणि नरेन्द्र बेडेकर करणार आहेत. 

टॅग्स :मुंबईसंगीत