Join us  

मोनो रेलच्या फेऱ्या वाढणार; चौथा डबा दाखल, गाडी जुळणीसाठी महिनाभराची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 9:57 AM

चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक मार्गावरील मोनो रेलच्या ताफ्यात चौथा डबा दाखल झाला आहे.

मुंबई : चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक मार्गावरील मोनो रेलच्या ताफ्यात चौथा डबा दाखल झाला आहे. महिनाभरात चार डब्यांच्या गाडीची जुळणी केल्यानंतर चाचण्यांना सुरुवात होणार आहे. ही गाडी सेवेत दाखल झाल्यानंतर ‘मोनो’च्या फेऱ्या वाढणार असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.

सध्या ‘मोनो’च्या ताफ्यात आठ गाड्या आहेत. त्यापैकी सहा गाड्यांतून प्रवासी वाहतूक सुरू आहे. दररोज सहा गाड्यांच्या ११८ फेऱ्या होत आहेत. सध्या या मार्गिकेवर दर १८ मिनिटांनी गाड्या धावत आहेत. मात्र, एवढा वेळ गाडीची वाट पाहणे शक्य नसल्याने प्रवासी ‘मोनो’कडे पाठ फिरवत आहेत. त्यामुळे या मार्गावरील गाडीच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यासाठी नव्या गाड्या खरेदी केल्या जात आहेत. 

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) अतिरिक्त १० गाड्यांच्या खरेदीसाठी मेधा सर्व्हो ड्राइव्हज कंपनीला ऑक्टोबर २०२१ मध्ये कंत्राट दिले आहे. कंपनीकडून पहिल्या गाडीचा शेवटचा डबा वडाळा कारशेडमध्ये दाखल झाला आहे. चार डब्यांच्या एका गाडीची जुळणी महिनाभरात ‘एमएमआरडीए’कडून केली जाणार आहे. त्यानंतर या गाडीच्या चाचण्या होऊन गाडी सेवेत दाखल होईल.

उर्वरित नऊ गाड्या डिसेंबरपर्यंत ताफ्यात-

‘मोनो’च्या उर्वरित नऊ गाड्या डिसेंबर २०२४ पर्यंत मुंबईत येतील. या गाड्या सेवेत दाखल झाल्यानंतर दर पाच मिनिटांनी फेऱ्या सुरू करता येणार आहेत. त्यामुळे दिवसभरातील फेऱ्यांची संख्या २५० पर्यंत वाढविणे शक्य होणार आहे. ‘मोनो’ची वाट पाहत ताटकळावे लागणार नाही.

... त्यावेळी दुर्लक्ष

‘मोनो’चे संचालन करणारी स्कोमी कंपनी दिवाळखोरीत गेल्यानंतर ‘एमएमआरडीए’ने संचालन हाती घेतले. कंपनीच्या काळात सुट्या भागांचा साठा व नवीन गाड्यांच्या बांधणीकडे दुर्लक्ष झाले होते. तसेच नादुरुस्ती आणि अन्य कारणांनी मोनो रेल्वे गाड्यांची संख्या घटली होती.

टॅग्स :मुंबईमोनो रेल्वे