Join us

कलास्पंदन महोत्सवात सृजनशील कलाकारांचा मेळा

By स्नेहा मोरे | Updated: November 29, 2023 18:43 IST

महोत्सवातील शिल्पकलेतील विविध कलाकृती या नवनव्या शैली व दृष्टिकोनातून साकारलेल्या आहेत. या शिल्पांचे प्रमुख केंद्रस्थान हे मानवी भावविश्व आहे.

मुंबई - इंडियन आर्ट प्रमोटर संस्थेतर्फे ' कलास्पंदन कला महोत्सव – २०२३ ' वरळी येथील नेहरु सेंटरच्या दालनात आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे १०० हून अधिक चित्रकार, शिल्पकारांचा सहभाग असून दीड हजार कलाकृती कला रसिकांना पाहण्याची संधी मिळणार आहे, हे प्रदर्शन ३ डिसेंबरपर्यंत कलारसिकांसाठी सकाळी ११ ते सायंकाळी सात या वेळेत खुले असणार आहे.

या कला महोत्सवात समकालीन चित्रकार व शिल्पकार यांच्या तैलरंग, जलरंग, अक्रेलिक, चारकोल, मिक्स मीडियम, ब्राँझ, धातुशिल्प वास्तववादी आणि निम्न वास्तववादी, अमूर्त शैलीतील कलाकृतींचे सादरीकरण होणार आहे. महोत्सवातील शिल्पकलेतील विविध कलाकृती या नवनव्या शैली व दृष्टिकोनातून साकारलेल्या आहेत. या शिल्पांचे प्रमुख केंद्रस्थान हे मानवी भावविश्व आहे.

या महोत्सवात मुख्यतः निसर्गचित्रे, अमूर्त शैलीतील कलाकृती, शहरी व ग्रामीण जीवनशैली व सामाजिक संस्कृतीचे दर्शन घडवणारी चित्रे, ऐतिहासिक वास्तु व गौरवशाली परंपरा यांचे वैशिष्ट्यपूर्ण व अनोखे सादरीकरण, भारतीय संस्कृतीविषयी विशेष व विविध परंपरा व रितीरिवाज दाखवणारी चित्रे, भावपूर्ण व्यक्तिचित्रे वगैरे साकारणारी बहुआयामी भावपूर्ण कलाकृती रसिकांना पाहता येतील.

टॅग्स :मुंबई