Join us  

खोट्या सह्यांच्या घोटाळ्यांवर ‘डिजिटल सिग्नेचर’चा उतारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2023 8:07 AM

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने कॉलेजेसना काढल्या सूचना

मुंबई :  गेल्या काही दिवसांत देशातील काही मेडिकल कॉलेजांमध्ये राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे बनावट पत्र आणि आयोगातील सदस्यांच्या खोट्या सह्या करून परवानगी प्रमाण पत्र मिळविले असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी आयोगाने आता मेडिकल कॉलेजशी करण्यात येणाऱ्या प्रत्येक पत्रावर डिजिटल सिग्नेचरचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सर्व कॉलेजेसना त्यांनी डिजिटल सिग्नेचर असलेलेच पत्र ग्राह्य धरावे, अशा सूचना दिल्या आहेत. 

राष्ट्रीय वैद्यकीय आयोग देशातील सर्व मेडिकल कॉलेजांवर नियंत्रण ठेवणारी संस्था आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाशी निगडित सर्व बाबींच्या परवानगीसाठी आयोगाची मान्यता अंतिम असते. त्यांच्या परवानगीशिवाय कोणताही निर्णय घेतला जात नाही. मेडिकल कॉलेजला नवीन अभ्यासक्रम सुरू करणे आणि मान्यतेसाठी विविध वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी तसेच कॉलेजचे नूतनीकरण करून घेण्यासाठी वैद्यकीय आयोगाकडून बंधनकारक असलेली विविध प्रमाणपत्रे घ्यावी लागतात. त्यामध्ये परवानगी,  मान्यता, नूतनीकरण, संलग्नता या प्रमाणपत्रांचा समावेश असतो. आयोग विविध तपासण्या करून प्रमाणपत्रे देत असते.  

बनावट प्रमाणपत्राने अभ्यासक्रमाच्या जागा वाढविल्या आंध्र प्रदेशमधील दोन मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय विषयातील विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्याचे वैद्यकीय आयोगाचे प्रमाणपत्र मिळाले. मात्र, चौकशी केल्यानंतर ते बनावट असून, त्यावरील स्वाक्षरीसुद्धा बनावट असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. या अशा पद्धतीने बनावट प्रमाणपत्र देऊन जर अभ्यासक्रमाच्या जागा वाढविण्यात येत असतील तर त्यातून अभ्याक्रमाची गुणवत्ता घसरण्याची शक्यता आहे.

टॅग्स :धोकेबाजीडॉक्टर