Join us
Daily Top 2Weekly Top 5

९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक

By सचिन लुंगसे | Updated: May 29, 2024 19:03 IST

सीएसएमटी येथे २४ डब्यांच्या रेल्वे गाड्या थांबविता याव्यात म्हणून फलाट क्रमांक १० आणि ११ चा विस्तार केला जात आहे.

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाटांच्या रुंदीकरणासह ठाणे येथील फलाटांच्या कामासाठी शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर विपरित परिणाम होणार असून, तिन्ही दिवशी एकूण ९३० लोकल फे-या रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे लोकल प्रवाशांची तारांबळ उडणार असून, या दिवशी शक्यतो नोकरदारांना वर्क फ्रॉर्म होम करू देण्याची विनंती मध्य रेल्वे प्रशासनाने कार्यालयांना केली आहे.सीएसएमटी येथे २४ डब्यांच्या रेल्वे गाड्या थांबविता याव्यात म्हणून फलाट क्रमांक १० आणि ११ चा विस्तार केला जात आहे. मध्य रेल्वेकडून हे काम पुर्ण करण्यासाठी शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सीएसएमटी येथील फलाटांच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे मुंबईबाहेर जाणा-या आणि मुंबईत येणा-या बहुतांशी मेल/एक्सप्रेस रद्द तर अंशत: रद्द करण्यात आल्या असून, आता याचा फटका लोकल गाड्यांनाही बसणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर दररोज १ हजार ८१० लोकल फे-या धावतात. मात्र आता तिन्ही दिवसांच्या ब्लॉकमुळे एकूण ९३० लोकल फे-या रद्द होणार असल्याने प्रवाशांची अतोनात हाल होणार आहेत.

वार / रद्द / अंशत: रद्द / अंशत: रद्दशुक्रवार / १६१ /  ०७ / ००शनिवार / ५३४ / ३०६ / ३०७रविवारी / २३५ / १३१ / १३९एकूण / ९३० / ४४४ / ४४६

मध्य रेल्वे मार्गावर तिन्ही दिवशी एकूण ९३० लोकल फे-या रद्द होतील. या काळात लोकलवरील गर्दीचा ताण कमी करण्यासाठी कार्यालयांना कर्मचा-यांना या काळात वर्क फ्रॉर्म होम करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती आम्ही कार्यालयांना केली आहे. जेणेकरून या काळात लोकलने प्रवास करणा-या प्रवाशांची संख्या कमी होईल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे २४ डब्यांच्या गाड्या उभ्या करण्यासाठी फलाट क्रमांक १० व ११ चा विस्तार केला जात आहे. १ जूनच्या मध्यरात्री १२.३० वाजल्यापासून २ जूनच्या दुपारी १२.३० पर्यंत यासाठी ब्लॉक घेतला जाईल. त्यात आता यात ठाणे येथील फलाटाच्या कामाचा समावेश करण्यात आला आहे.

टॅग्स :मुंबई लोकल