नवी मुंबई : महापालिकेचे कामकाज नियमानुसार व्हावे व कमीत कमी त्रुटी राहाव्या, यासाठी गत वर्षभरापासून विशेष लक्ष दिले जात आहे. लेखापरीक्षणाविषयी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून, त्याचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. उपमहालेखापालांच्या अध्यक्षतेखालील समितीने पालिकेच्या अनुपालन अहवालातील १२४ पैकी ९१ परिच्छेद वगळले आहेत. शासकीय कार्यालयामधील कामकाजामध्ये लेखापरीक्षणास विशेष महत्त्व आहे. कामकाज करताना राहिलेल्या त्रुटी लेखापरीक्षणातून पुढे येतात. अनेक घोटाळेही यामधून उघडकीस येतात. महानगरपालिकेमधील कामकाज नियमाप्रमाणे व्हावे यासाठी आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी वर्षभरापासून प्रयत्न सुरू केले आहेत. लेखापरीक्षण तयारी व दक्षता याविषयी कार्यशाळांचे आयोजन करून तज्ज्ञांना मार्गदर्शनासाठी बोलावण्यात आले होते. अनुपालन अहवाल कसा तयार करायचा व इतर गोष्टींवर मार्गदर्शन करण्यात आले. पारदर्शक कारभारासाठी महालेखापालक कार्यालयाकडून यापूर्वी झालेल्या लेखा परिक्षणातील आक्षेपांचे निराकरण करण्यासाठी विभागीय लेखा परीक्षा समितीची बैठक घेण्याची विनंती करण्यात आली होती. डिसेंबरमध्ये दोन दिवसांची बैठक झाली. उपमहालेखापाल यांच्या अध्यक्षतेखालील समितीने प्रलंबित परिच्छेदांच्या अनुषंगाने सर्व विभागांचे अनुपालन अहवाल व अनुषंगिक सर्व कागदपत्रांची काटेकोर तपासणी केली व १२४ पैकी ९१ आक्षेप वगळण्यात आले आहेत. लेखापरीक्षणासाठी पालिकेने स्वत:हून पुढाकार घेणे ही बाब कौतुकास्पद व इतरांनी अनुकरण करावे असे मत उपमहालेखापाल यांच्या अध्यक्षतेखालील विभागीय लेखापरीक्षण समितीने व्यक्त केले आहे. पालिकेने स्वतहून लेखापरीक्षा समितीस पाचार करून लेखापरीक्षण करून घेतल्याबद्दल नगरविकास विभागाचे प्रधान सचीव श्रीकांत सिंह यांनीही समाधान व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)
पालिका लेखापरीक्षणातील ९१ आक्षेप वगळले
By admin | Updated: November 30, 2014 23:15 IST