Join us  

समुद्रसफरीवरील ९0 हजार खलाशांना हवा मतदानाचा अधिकार! ‘मस्सा’ची नौकानयन मंत्र्यांना विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 5:13 AM

कामानिमित्त समुद्रसफरीवर असलेल्या खलाशांना लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याची संधी मिळावी, अशी मागणी केंद्रीय नौकानयन राज्यमंत्री मनसुख मांडवीया यांच्याकडे केली आहे

मुंबई : कोट्यवधी भारतीय मतदार लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी सज्ज झालेले असतानाच, ‘मेरिटाइम असोसिएशन आॅफ शिपओनर्स, शिपमॅनेजर्स अ‍ँड एजंट्स’ (मस्सा) या देशातील सर्वात मोठ्या मेरीटाइम असोसिएशनने कामानिमित्त समुद्रसफरीवर असलेल्या खलाशांना लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याची संधी मिळावी, अशी मागणी केंद्रीय नौकानयन राज्यमंत्री मनसुख मांडवीया यांच्याकडे केली आहे.सध्या भारतीय खलाशांची संख्या सुमारे दोन लाखांहून अधिक असली तरी कोणत्याही वेळी किमान ९0 हजार खलाशी हे त्यांचे कर्तव्य बजावण्यासाठी समुद्रसफरीवर असतात, त्यामुळे अशा खलाशांना निवडणुकीत मतदान करण्याची संधी मिळत नाही, असं ‘मस्सा’चे म्हणणे आहे.‘आंतरराष्ट्रीय जगताशी असलेल्या भारतीय व्यापारात आपले हजारो खलाशी हे कित्येक महिने आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहून अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात. मात्र, त्यांना मतदान करण्याची संधी मिळत नाही. भारतीय संविधानानुसार, त्यांनाही त्यांचा मताधिकार बजावण्याची संधी मिळायलाच हवी’’, असे मत ‘मस्सा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिव हळबे यांनी व्यक्त केले.नौकानयन महासंचालनालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या पाच वर्षांत भारतीय खलाशांच्या संख्येत १00 टक्क्यांनी वाढ झाली आहे. २0१३ मध्ये भारतीय खलाशांची संख्या १,0८,000 होती, ती २0१८ मध्ये २,0८,000 इतकी वाढली. ‘हे खलाशी भारतीय तसंच परदेशी मालवाहतूक नौकांमध्ये कार्यरत असतात, आणि जगभरातील विविध देशांना तसंच बंदरांना भेटी देतात. या समुदायाला त्यांचा मतदानाचा हक्क मिळायला हवा’’, असेही शिव हळबे यांनी सांगितले.‘भारतीय निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांनुसार, जगभरातील भारतीय दूतावासांमध्ये भारतीय खलाशांना लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याची संधी मिळावी’, असं मत ‘नॅशनल यूनियन आॅफ सीफेरर्स आॅफ इंडिया’ या देशातील सर्वात जुन्या शिपिंग युनियनचे सरचिटणीस अब्दुलगनी सेरंग यांनीही व्यक्त केले आहे.

टॅग्स :निवडणूकमतदान