लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात सरासरीच्या तुलनेत अधिक पावसाची नोंद होत असून, येथील प्रशासन किंवा कोणतीच यंत्रणा पावसाचे पाणी जमिनीत मुरुन जलसाठा वाढावा म्हणून कार्यान्वित नाही. याचा परिणाम म्हणून गेल्या वीस वर्षांत मायानगरी मुंबईतले सुमारे ९० टक्के जलस्रोत चोरीला गेले आहेत.
मुंबईतले सुमारे ९० टक्के जलस्रोत चोरीला जात असताना याबाबत कोणीच ब्रदेखील काढलेला नाही, अशी खंत जल अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. विहिरी, जलस्रोत किंवा वाहते नाले यांची चोरी होताना, त्यावर आक्रमण होताना यंत्रणेला गुंगारा दिला जात आहे. यंत्रणेला माहीतदेखील होणार नाही या पध्दतीने जलस्रोत नष्ट करण्यात आले असून, अशा प्रकरणांची माहिती मिळाल्यानंतर कारवाई अपेक्षित असताना काहीच हालचाल होत नसल्याने या क्षेत्रात काम करत असलेल्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. आतातरी आहेत त्या जलस्रोतांच्या संवर्धनासाठी यंत्रणांनी सजग राहिले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
--------------------------------
हे घ्या पुरावे
१) मुंबईच्या पाणी प्रश्नावर अभ्यास करताना एका स्वयंसेवी संस्थेने सांगितले की, जोगेश्वरी, चिता कॅम्पमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार, ठिकठिकाणी असलेल्या विहिरींमधील पाणी खराब असल्याने त्या विहिरी बुजविण्यात आल्या.
२) काही ठिकाणी विहिरीमध्ये सांडपाणी जात असल्याचे कारण दाखवत विहिरी बुजविण्यात आल्या. हे चित्र केवळ जोगेश्वरी किंवा चिता कॅम्पमध्ये नाही तर मुंबईतल्या बहुतांशी ठिकाणी आहे.
३) काही ठिकाणी विहिरींमध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून विहीर बंद करण्यात आली. अशा विहिरी बंद करण्यात आल्याने तेथे दगड टाकून बांधकामे उभारण्यात आली तर काही ठिकाणी नाले बंद केले आहेत. त्यावर बांधकामे केली आहेत.
--------------------------------
मुंबईत कित्येक वस्त्या पाण्यापासून वंचित आहेत. आपण आजच पाण्याची गरज ओळखली पाहिजे. सर्वांना पाणी मिळावे आणि जलस्रोतांचे संवर्धन व्हावे यासाठी मुंबईतल्या प्रत्येक यंत्रणेने काम केले पाहिजे; कारण पाणी हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि प्रत्येकाची गरज आहे.
- जगदीश पाटणकर, जल अभ्यासक
----------------
मुंबईच्या पाणी प्रश्नाबाबत दहा समित्या होत्या. दहावी समिती चितळेंची होती. नऊ समित्यांनी चांगल्या सूचना दिल्या. तांत्रिक दृष्टीकोनातून उपाययोजना सुचवल्या. मात्र, त्याचे गांभीर्य मुंबई महापालिकेला कळलेच नाही. चितळे समितीने म्हटले होते की, नऊ समित्यांचे जे झाले ते आमचे होऊ नये. मात्र, त्यांचेही तेच झाले. आपल्याला उपाय व तंत्रज्ञान माहीत आहे. मात्र, ज्यांनी अंमलबजावणी करायचे त्यांना ते कळत नाही. आपण शहरे बांधताना कसेही रस्ते बांधले आहेत. अशाने पाणी वाहून जाण्यास अडथळा येतो.
- प्रदीप पुरंदरे, जल अभ्यासक
--------------------------------
अर्धी विहीर झाकली
घाटकोपर पश्चिम कामा लेन येथील त्रिभुवन मिठाईवालाच्या मागे रामनिवास सोसायटीतील विहिरीवर कित्येक वर्षांपूर्वी सोसायटीने अर्ध्या भागात आरसीसी करून अर्धी विहीर झाकली होती. त्यावर सोसायटीतील रहिवासी वाहने पार्क करत असत. मात्र, हाच आरसीसीचा भाग खचून त्यावर पार्क केलेली कार पाण्यात बुडाल्याची घटना १३ जून रोजी घडली होती.
--------------------------------