मुंबई : अवयवदानाचा टक्का वाढला पाहिजे़ अनेक रुग्णांना अवयव प्रत्यारोपणाची गरज असते; पण जनजागृती नसल्यामुळे अवयव मिळत नाहीत, असे एका वर्षापूर्वीचे चित्र होते. पण २०१५ च्या सुरुवातीलाच कॅडेव्हर डोनेशनमुळे ९ जणांना जीवनदान मिळाले आहे. जनजागृतीमुळे अवयवदानाचा टक्का वाढेल, अशी आशा या क्षेत्रातील तज्ज्ञांना वाटत आहे. वांद्रे येथील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये एका ६६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मंगळवार, १३ जानेवारी रोजी मृत्यू झाला. या रुग्णाला ब्रेनडेड घोषित केल्यावर त्यांच्या नातेवाइकांनी त्या व्यक्तीची किडनी आणि यकृत दान करण्याचा निर्णय घेतला. एक किडनी एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमधील एका रुग्णाला दिली असून, दुसरी किडनी जसलोक रुग्णालयात पाठवली. यकृत ज्युपिटर रुग्णालयातील एका रुग्णाला दिले. २०१५ मधील पहिले कॅडेव्हर डोनेशन ५ जानेवारी रोजी झाले होते. यानंतर अवघ्या पाच दिवसांतच दुसरे कॅडेव्हर डोनेशन नानावटी रुग्णालयात झाले. ७३ वर्षीय पुरुषाचा नानावटी रुग्णालयात मृत्यू झाल्यावर त्याची किडनी आणि यकृत दान करण्यात आले. या व्यक्तीची एक किडनी लीलावती तर दुसरी किडनी हिंदुजा रुग्णालयातील रुग्णांना देण्यात आली. यकृत ज्युपिटर रुग्णालयातील रुग्णासाठी पाठवण्यात आले. गेल्या वर्षी ७१ किडनी, ३६ यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्या असून, ४१ कॅडेव्हर डोनेशन झाली होती. २०१३ मध्ये ३६ किडनी आणि १९ यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्या होत्या, तर २४ कॅडेव्हर डोनेशन झाली होती.(प्रतिनिधी)
नऊ दिवसांत ९ जणांना जीवनदान
By admin | Updated: January 15, 2015 02:12 IST