- पंकज रोडेकर,ठाणे
लहान मुलांबाबत दाखल गुन्ह्यांना वेळीच आळा घालण्यासाठी ठाणे शहर पोलीस दलात सुरू झालेल्या ठाणे चाइल्ड्स प्रोटेक्शन युनिटने मागील दोन वर्षांत ९०३ मुलांना स्वगृही धाडले आहे. यामध्ये अपहरण झालेले ३२०, हरवलेले १२९, बालकामगार १०२, भिक्षेकरी १०५ अशा मुलांचा समावेश आहे. तसेच पळून जाणाऱ्यांत मुलींपेक्षा मुलांचे प्रमाण अधिक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट दिसते. स्वगृही परतलेल्या मुलांची संख्या ५२१ असून मुलींची संख्या ३०६ असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुलांच्या शोध मोहिमेसाठी चार वेगवेगळे आॅपरेशन राज्य पोलिसांच्या माध्यमातून राबवण्यात आले. पहिल्या आॅपरेशन मुस्कानमध्ये २२७ मुलांना तर दुसऱ्या आॅपरेशन स्माइलमध्ये १६२, तसेच तिसऱ्या आॅपरेशन महाराष्ट्रअंतर्गत ७७ त्याचबरोबर चौथ्या आॅपरेशन मुस्कान महाराष्ट्र-दोन या अंतर्गत ७९ राज्यातील नाही तर परराज्यातील मुलांना त्यांच्यावर समुपदेश करून पालकांच्या हवाली करण्यात यश आले. या मुलांच्या पालकांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्याजोगा असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तत्कालीन ठाणे शहर पोलीस आयुक्त विजय कांबळे आणि तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांच्या संकल्पनेतून ‘चाइल्ड्स प्रोटेक्शन युनिट’ची निर्मिती शहर पोलीस दलात झाली. १७ जुलै २०१४ रोजी तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या उपस्थितीत राज्यातील पहिले म्हणून सुरू केलेल्या युनिटच्या माध्यमातून शोध मोहिमेला सुरुवात झाली. या वेळी जिल्ह्णातील हरवलेल्या मुलांसाठी काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांना पोलिसांनी मदतीला घेऊन कामाला गेले. ‘‘पोलीस ठाण्यांनी १६० तर चाइल्ड्स प्रोटेक्शन युनिटने ७४३ मुलांना स्वगृही पाठवले असून चार आॅपरेशनमध्ये ५४५ मुलांना पालकांपर्यंत पोहोचवल्याने त्यांच्या चेहऱ्यावर मुस्कान दिसून आली आहे. यामध्ये एक-दोन घटनांमध्ये मुले पुन्हा सापडली आहेत. युनिट कर्मचाऱ्यांची प्रचंड मेहनत आहे.’’- एस.एस. काळबांडे, वरिष्ठ पोलीस,निरीक्षक, सीपीयू ठाणे शहर