मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या साहाय्यक सरकारी अभियोक्ताच्या (गट-अ) सर्वसाधारण बदल्यांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत राहिलेल्या ८७ वकिलांच्या अन्यत्र बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात मुंबईतील १४ जणांचा समावेश असून त्यांच्या ठाणे, रायगड, पुणे जिल्ह्यात बदल्या केल्या आहेत. त्यांना नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी तत्काळ सध्याच्या पदावरून कार्यमुक्त करण्याची सूचना करण्यात आली आहे.पोलिसांनी एखाद्या गुन्ह्याचा तपास करून आरोपपत्र न्यायालयात दाखल केल्यानंतर त्याबाबत शासनातर्फे बाजू मांडण्याचे काम सरकारी अभियोक्त्यांना करावे लागते. पूर्णवेळ व कायमस्वरूपी कार्यरत असलेल्या या सरकारी वकिलांच्या दरवर्षी साधारण मे/जूनमध्ये बदल्या होतात. मात्र विविध कारणांमुळे त्या रेंगाळल्या होत्या. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंजुरीनंतर बदलीला ‘ड्यू’ असणाऱ्या ८७ जणांच्या अन्य जिल्ह्यात बदल्याचे आदेश गृह विभागाकडून देण्यात आले. साहाय्यक सरकारी वकील गट-अ च्या बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांपैकी १३ जणांना नक्षलग्रस्त व आदिवासी भागात पाठविण्यात आलेले आहे. त्यांना तत्काळ नियुक्तीच्या ठिकाणी रुजू व्हायचे आहे अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
८७ सरकारी वकिलांच्या बदल्या
By admin | Updated: September 3, 2015 01:16 IST