Join us

ठाण्यात ८२ टक्के बांधकामे अनधिकृत

By admin | Updated: June 15, 2016 02:27 IST

शहरात नव्याने एकही अनधिकृत बांधकाम होत नसल्याचा ठाणे महापालिकेचा दावा माहिती अधिकारात मात्र फोल ठरला आहे. एकीकडे स्मार्ट सिटीची स्वप्ने बघणाऱ्या ठाणे महापालिकेला

ठाणे : शहरात नव्याने एकही अनधिकृत बांधकाम होत नसल्याचा ठाणे महापालिकेचा दावा माहिती अधिकारात मात्र फोल ठरला आहे. एकीकडे स्मार्ट सिटीची स्वप्ने बघणाऱ्या ठाणे महापालिकेला अनधिकृत बांधकामांवर अंकुश ठेवणे मात्र आजही शक्य होत नसल्याचे या माहीतीतून समोर आले आहे. शहरातील १ लाख ६७ हजार बांधकामांपैकी केवळ ३० हजार ३३६ म्हणजेच १८ टक्के बांधकामे अधिकृत असून उर्वरीत ८२ टक्के म्हणजेच १ लाख ३ हजार ७७० बांधकामे बेकायदा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे याच अनधिकृत बांधकामधारकांकडून मालमत्ताकराची विक्रमी वसुली होत आली आहे. ठाण्यातील अलर्ट सिटीझन फोरम आॅफ इंडियाचे अध्यक्ष दयानंद नेने यांनी माहितीच्या अधिकारात ही माहिती समोर आणली आहे. त्यांनी पालिकेकडे २०११ -१२ ते २०१५-१६ या कालावधीत शहरातील अधिकृत आणि अनाधिकृत बांधकामांची आकडेवारी पालिकेकडे मागितली होती. त्यांना मिळालेली आकडेवारी ही खरोखरच शहराला धक्का देणारी ठरली आहे. उथळसर, नौपाडा, कोपरी, कळवा, विटावा, खारीगाव, मुंब्रा, कौसा, शिळ, दिवा, वागळ इस्टेट, रायलादेवी, वर्तकनगर, माजीवाडा बळाकूम, कोलशेत, मानपाडा, ओवळा आणि लोकमान्यनगर अशा १९ प्रभागांमध्ये ही आकडेवारी देण्यात आली आहे. सर्वाधिक १९ हजार ७३३ बेकायदा बांधकामे रायलादेवी प्रभागात असून तेथील अधिकृत बांधकामांची संख्या केवळ ९३६ इतकी आहे. त्याखालोखाल लोकमान्य नगर (१५,८२८), वर्तकनगर (११,९५७), कळवा (११,२२१), मुंब्रा (९,०२२), मानपाडा (९८७५) अशी बेकायदा बांधकामांची संख्या असल्याची माहिती समोर आली आहे. (प्रतिनिधी)ठाणे महापालिकेच्या तिजोरीत यंदा ३४६ कोटींचा मालमत्ता कर जमा झाला आहे. त्यामध्ये तब्बल २८४ कोटींचा करभरणा हा बेकायदा मालमत्ताधारकांनी केला असल्याची माहितीदेखील माहिती अधिकारातून समोर आली आहे. तर अधिकृत बांधकामांमध्ये राहणाऱ्या ठाणेकरांकडून ६२ कोटी रु पयांची करवसूली झाली आहे. प्रत्यक्षात शहरातील बेकायदा बांधकामांकडून दुप्पट कर वसुलीची तरतूद आहे. त्यानंतरही १८ टक्के अधिकृत बांधकामांकडून २१ टक्के ८२ टक्के बेकायदा बांधकामंकडून ७९ टक्के कर वसूल होत आहे.