Join us

८० टक्के मुंबईकरांना मिळाला लसीचा पहिला डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:07 IST

मुंबई : मुंबईला तिसऱ्या लाटेचा धोका असताना आता दिलासादायक बाब म्हणजे ८० टक्के मुंबईकरांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात ...

मुंबई : मुंबईला तिसऱ्या लाटेचा धोका असताना आता दिलासादायक बाब म्हणजे ८० टक्के मुंबईकरांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. त्यामुळे आता लवकरच लसीकरण मोहीम वेगाने राबविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. तर दुसरीकडे राज्यातही या महिन्यात आठ कोटी डोसची पूर्तता करण्याचे लक्ष्य आरोग्य विभागाने ठेवले आहे.

मुंबईत ४४ लाख लाभार्थ्यांना पहिला डोस देण्यात आला आहे. तर ३० लाख लाभार्थ्यांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. शहर, उपनगरातील विविध नामांकित कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमाच्या माध्यमातून मिळालेल्या निधीतून लसीकरणाला वेग देण्यात येणार आहे. मुंबईतील काही कंपन्यांकडून पालिकेला देणगी म्हणून सुमारे आठ लाख डोस मिळणार आहेत. या डोसचा वापर झोपडपट्टीतील लाभार्थ्यांच्या लसीकरणासाठी करण्यात येणार आहे. आतापर्यंत साधारणत: दोन लाख लसी प्राप्त झाल्या आहेत. सध्या गोदरेज, रिलायन्स, सीटी बँक, सिप्ला अशा अनेक खासगी कंपन्यांकडून लस मिळाली आहे, त्यामुळे लवकरच या माध्यमातून लसीकरणाला गती मिळेल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

राज्याच्या आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले, राज्यात १८ ते ४४ वयोगटातील ३५ टक्के लाभार्थ्यांना पहिला डोस देण्यात आला. तर ४५ हून अधिक वय असणाऱ्या ५४ टक्के लाभार्थ्यांचा पहिला डोस झाला आहे. लसीचा पुरवठा नियमित झाल्यास लवकरच दोन कोटी लसींचा टप्पा पूर्ण करण्यात येईल. सप्टेंबरच्या पहिल्या तीन दिवसांत राज्याला २५ लाख लसींचे डोस मिळाले आहेत.