Join us
Daily Top 2Weekly Top 5

४ हजार सोसायट्यांमध्ये ८ हजार ५०० शेअर चार्जर लागले

By सचिन लुंगसे | Updated: March 19, 2024 19:27 IST

एखाद्या गृहनिर्माण सोसायटीला इमारतीच्या आवारात शेअर चार्जिंग सुरु करायचे असल्यास त्यांना अदानी इलेक्ट्रिसिटीकडे अर्ज करावा लागतो.

मुंबई: इलेक्ट्रिक वाहनांचे चार्जिंग सहजपणे करता यावे यासाठी गृहनिर्माण संस्थांमध्ये शेअर चार्जिंग उपक्रम सुरू करण्यात आला असून, यात मुंबईच्या उपनगरांमधील चार हजार सोसायट्यांमध्ये साडेआठ हजार चार्जर लावण्यात आले आहेत.

एखाद्या गृहनिर्माण सोसायटीला इमारतीच्या आवारात शेअर चार्जिंग सुरु करायचे असल्यास त्यांना अदानी इलेक्ट्रिसिटीकडे अर्ज करावा लागतो. त्यानुसार, अदानीकडून याकरिता स्वतंत्र वीज मीटर लावला जातो आणि शेअर चार्जिंग सुरु केले जाते. एका शेअर चार्जिंगवर ३० रुपयांत एक दुचाकी फुल चार्ज होते. तर एक चार चाकी वाहन चार्ज करण्यासाठी तीन ते साडेतीन तास लागतात; आणि यासाठी साडेतीनशे रुपये लागतात. या शेअर चार्जिंगवर कोणालाही वाहन चार्ज करता येते. वाहन चार्ज केल्यानंतर वॉलेटमध्ये जमा केलेले पैसे कोड स्कॅन करून भरता येतात.

  • सोसायटीमध्ये एकापेक्षा अधिक शेअर चार्जिंग बसविता येतात.
  • वाहने चार्जिंगला कधी आणावीत, कोणी किती वेळ चार्जिंग केले व त्याचे बिल किती झाले ते ठरवून त्याचे पैसे देणे ही व्यवस्था अॅपमार्फत केली जाते.
  • एका चार्जवर अनेक गाड्यांचे चार्जिग होऊ शकते.

 आमच्या सोसायटीत शेअर चार्जिंग स्टेशन उभारण्याची कल्पना खूपच चांगली ठरली. ते अत्यंत सोईस्कर असून त्याचा रहिवाशांना मोठा फायदा झाला. - एम. गौतमन, सचिव, धीरज सवेरा टॉवर सहकारी गृहनिर्माण संस्था, सिद्धार्थ नगर, बोरिवली शेअर चार्जिंग व्यवस्थेमुळे माझे पैसेही वाचले. प्रदूषण कमी करण्यासही माझ्याकडून हातभार लागला. - अमित मूलचंदानी, रुणवाल एलिजंट सहकारी गृहनिर्माण संस्था, शास्त्रीनगर, अंधेरी

टॅग्स :मुंबई