पूजा सामंत - मुंबई
मुंबई अॅकॅडमी ऑफ मूव्हिंग इमेजेस अर्थात मुंबई फिल्म फेस्टिव्हलचे मुंबईत 14 ते 21 ऑक्टोबरदरम्यान बिगुल वाजणार आहे. त्यामुळे गेले काही दिवस सुरू असलेला मामि फिल्म फेस्टिव्हल आर्थिक चणचणीमुळे बंद होणार की काय या चर्चाना आता पूर्णविराम मिळाला आहे. फेस्टिव्हल बंद होण्याचा संभाव्य धोका तूर्तास टळला असून, सिनेप्रेमींना यंदाच्या फेस्टिव्हलमध्ये जगभरचे तब्बल 185 सिनेमे पाहण्याची मेजवानी मिळणार आहे.
मामि फेस्टिव्हलवर आलेले आर्थिक संकट दूर झाले; कारण सिनेप्रेमींनी सोशल नेटवर्किग साइट्स आणि एसएमएसच्या साहाय्याने 2.75 कोटींची रक्कम उभी केली आणि मामिचे यंदाचे 16वे वर्ष साजरे करण्याचा संकल्प केला.
यंदाचे ठळक वैशिष्टय़ म्हणजे मामिमध्ये 65 देशांचा सहभाग असून, त्यात 185 चित्रपट सिने-रसिकांना पाहता येणार आहेत. पीव्हीआर सिनेमा आणि लिबर्टी सिनेमा (मरिन लाइन्स) येथे हे चित्रपट पाहता येतील, विशेष म्हणजे बॉलीवूडमधील अनेक नामवंत कलाकारांनीही आपले आर्थिक योगदान यासाठी दिले आहे. विधू विनोद चोप्रा, भूषण कुमार, आमिर खान, शाहिद कपूर, वरुण धवन, राहुल बोस, राजकुमार राव, दिग्दर्शक करण जोहर, राजकुमार हिरानी, हंसल मेहता, अनुराग कश्यप अशा अनेकांच्या आर्थिक सहभागामुळे मामिचे आयोजन शक्य झाले, असे प्रतिपादन फेस्टिव्हलचे निर्देशक श्रीनिवासन नारायणन यांनी केले.
यंदाच्या फेस्टिव्हलमध्ये ‘रिमेक राइट्स ऑफ फॉरिन फिल्म्स इन इंडिया आणि त्यांची बाजारपेठ’ या आजच्या ज्वलंत विषयावर चर्चासत्र होणार आहे. सिनेविषयक अनेक स्पर्धा हेदेखील एक आकर्षण असून गौरी शिंदे, सतीश कौशिक, होमी अडजानिया हे दिग्दर्शक तर सिनेअभिनेत्री हुमा कुरेशी या चर्चासत्रचे परीक्षक
असतील.
लोकप्रिय फ्रेंच अभिनेत्री कॅथिरन डेनेव्ह्यू हिला तिच्या अनेक गाजलेल्या भूमिकांसाठी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मामिच्या अनेक ठळक वैशिष्टय़ांपैकी एक म्हणजे अरब सिनेमांवर टाकण्यात येणारा प्रकाशझोत. 195क् ते 2क्14 या कालखंडातील उत्कृष्ट 25 अरब सिनेमांची निवड यासाठी केली गेली आहे. इतक्या भरगच्च सिनेकार्यक्रमांमुळे सिनेरसिकांसाठी मामि फिल्म फेस्टिव्हल मनोरंजन आणि ज्ञानाची भरगच्च पर्वणी सिद्ध होणारेय हे नक्की.