Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुलांना शाळेत पाठविण्यास ७६ टक्के पालकांची नकारघंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:06 IST

रुग्णसंख्या शून्यावर येईपर्यंत किंवा मुलांना लस उपलब्ध होईपर्यंत शाळेत पाठविण्यास नकारलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशात कोरोनाची लाट ...

रुग्णसंख्या शून्यावर येईपर्यंत किंवा मुलांना लस उपलब्ध होईपर्यंत शाळेत पाठविण्यास नकार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : देशात कोरोनाची लाट हळूहळू ओसरत असल्याने विविध राज्यांनी टप्प्याटप्प्याने का होईना शाळा सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र असे असले तरी अद्याप देशातील ७६ टक्के पालक आपल्या मुलांना शाळेत पाठविण्यास तयार नसल्याचे ‘लोकल सर्कल’ या संस्थेने केलेल्या देशव्यापी सर्वेक्षणातून समोर आले आहे. जोपर्यंत ते राहत असलेल्या ठिकाणच्या भागाचे संपूर्ण लसीकरण होऊन कोरोना संख्या शून्यावर येत नाही किंवा मुलांना स्वतःला लस मिळत नाही तोपर्यंत मुलांना शाळांमध्ये पाठविण्याचा धोका आपण पत्करू शकत नसल्याच्या प्रतिक्रिया पालकांनी दिल्या आहेत.

प्रत्यक्षात शाळा बंद असल्यामुळे आणि ऑनलाइन शिक्षणाच्या सुविधांअभावी ग्रामीण भागातील आणि आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थी शिक्षण प्रवाहापासून दूर जात आहेत. त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असता शाळा प्रत्यक्ष सुरू कराव्यात अशी मागणी होत आहे. पण ‘लोकल सर्कल’कडून मार्च २०२० पासून आतापर्यंत शाळा सुरू करण्याच्या बाबतीत शिक्षक, तज्ज्ञ, पालक विद्यार्थ्यांचे आतापर्यंत ६ वेळा सर्वेक्षण केले आहे. यात देशाच्या २९३ हून अधिक जिल्ह्यांतून १० हजारांहून अधिक पालकांनी मत व्यक्त केले आहे.

सर्वेक्षणातील मते

३७ टक्के पालकांनी मुलांना जोपर्यंत लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत मुलांना शाळेत पाठविणार नसल्याचे उत्तर दिले.

२० टक्के पालक प्रत्यक्षात शाळा सुरू होतील तेव्हा मुलांना शाळेत पाठविणार असे म्हणाले.

२४ टक्के पालकांनी आपल्या आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या शून्यावर येईपर्यंत मुलांना शाळेत पाठविणार नसल्याचे सांगितले.

१५ टक्के पालकांनी आपल्या जिल्ह्यातील रुग्णसंख्या शून्यावर येईपर्यंत मुलांना शाळेत पाठवणार नसल्याचे म्हटले.

४ टक्के पालक यासंदर्भात मत व्यक्त करू शकले नाहीत.

तिसऱ्या लाटेचा धसका

पालकांच्या एकूण प्रतिक्रियांचा विचार केला असता ४९ टक्के पालक मुलांचे लसीकरण आणि जिल्ह्यातील शून्य रुग्णसंख्या यावर ठाम आहेत. मागील सर्वेक्षणांचा विचार केला असता मागील चार महिन्यांत पालकांची मुलांना शाळेत पाठविण्याची तयारी ही ६९ टक्क्यांवरून ४९ टक्क्यांवर म्हणजेच २० टक्क्यांनी घसरली आहे. यावरून तिसऱ्या लाटेचा लहान मुलांवर होणाऱ्या परिणामाचा धसका पालकांनी घेतल्याचे दिसून येत आहे.