Join us
Daily Top 2Weekly Top 5

भाडे नाकारणाऱ्या ‘ॲप’वाल्या टॅक्सींना बसणार 75000चा दंड; ओला, उबेर चालकांना वेसण, रक्कम थेट प्रवाशांच्या खात्यात

By नितीन जगताप | Updated: May 20, 2023 14:02 IST

चालकांचा विमा असणे आवश्यक आहे; तसेच कंपनीने प्रवाशांचा विमाही काढलेला असावा. चालकाची माहिती प्रवाशाला व्हावी,  यासाठी  चालकाकडे ओळखपत्र असायला हवे.

मुंबई : कामावर वेळेवर पोहोचण्यासाठी किंवा घरी जाताना ट्रेन लवकर बंद झाल्या की आधार असतो तो ॲपवर आधारित गाड्यांचा. ओला आणि उबेर या कंपन्या मुंबईसह उपनगरांत सुविधा देतात. मात्र, अनेकदा हे टॅक्सीचालक मनमानीपणा करतात आणि भाडे नाकारतात. अनेकदा हे टॅक्सीचालक उशिरा येतात. त्यांच्या या मनमानीला चाप बसावा यासाठी प्रवाशांप्रमाणेच चालकांनाही दंड लावावा, अशी मागणी होत आहे. याचा परिवहन  विभाग गांभीर्याने विचार करत असून भाडे नाकारल्यास चालकाला ५० ते ७५ रुपयांचा दंड बसणार आहे. त्याची रक्कम प्रवाशाच्या खात्यात जमा करण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती परिवहन विभागाच्या सूत्रांनी दिली. लवकरच महाराष्ट्र मोटारवाहन समुच्चयक नियमावली समितीची बैठक होणार असून त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. वास्तविक सहल परवान्यावर असलेल्या या टॅक्सी शहरांतर्गत वाहतुकीसाठी वापरणे अनधिकृत आहे. याबाबतचे प्रकरण सध्या न्यायालयात असल्याने त्याबाबत कारवाई होत नाही. मात्र, ॲपच्या माध्यमातून टॅक्सी  चालविल्या जात आहेत. या टॅक्सीचालकांना ॲपवर भाडे उपलब्ध होत असल्याने रस्त्यावरून भाडे मिळण्याची आवश्यकता राहत नाही. त्यामुळे सर्रास भाडे नाकारले जाते. ॲपवर रिक्षा व्यवसाय करणाऱ्यांवर आणि त्याबाबतच्या जाहिरातींबाबत मध्यंतरी आरटीओकडून कारवाई झाली. मात्र, त्यानंतर पुढे कोणतीही कारवाई न झाल्याने आता रिक्षांसाठी खासगी ॲपची व्याप्ती आणि रिक्षा प्रवाशांच्या तक्रारीही वाढत आहेत. विशेषत: ओला आणि उबर चालकांची मनमानी वाढत आहे. जर भाडे नको असेल तर चालकांकडून नकार दिला जातो. त्याचा भुर्दंड प्रवाशांना सोसावा लागतो. या पार्श्वभूमीवर ओला आणि उबरचालकांनाही दंड करावा अशी मागणी होत होती. 

चालकांचा विमा असणे आवश्यक आहे; तसेच कंपनीने प्रवाशांचा विमाही काढलेला असावा. चालकाची माहिती प्रवाशाला व्हावी,  यासाठी  चालकाकडे ओळखपत्र असायला हवे.

भाडे नाकारल्यास दंड भाडे नाकारणाऱ्या  चालकाला दंड आकारला जाणार असून, तो दंड प्रवाशाच्या खात्यात जमा होणार आहे. उशीर केल्यास दंड ओला उबेर चालक अनेकदा पिकअप लोकेशनवर पोहोचण्यास उशीर लावतात; त्यामुळे प्रवासी कंटाळून भाडे रद्द करतात; परंतु आता चालकाला १० मिनिटे कंपनीची आणि अधिक १० मिनिटे अतिरिक्त दिली जाणार आहेत. २० मिनिटांपेक्षा जास्त कालावधी लावल्यास दंड आकारला जाणार आहे. 

कमाल भाडे दर गर्दीच्या वेळा ओला उबेरकडून  चार ते पाचपट दर आकारले जातात. त्याला आळा घालण्यासाठी कमाल भाडेदर ठरविण्यात येणार आहे. 

काही ओला उबेर चालक भाडे नाकारतात. त्यांना दंड आकारावा,  अशीही  प्रवाशांची मागणी रास्त आहे. सर्व ओला-उबेर चालक चुकीचे नाहीत; पण काही चालक मनमानीपणा करतात, त्यांना लगाम घालणे अत्यंत गरजेचे आहे. ते सुधारणे गरजेचे आहे.- सुनील बोरकर, सरचिटणीस महाराष्ट राज्य राष्ट्रीय कामगार संघ वाहतूक  विभाग 

सर्वाधिक तक्रारी भाड्याबाबतकेंद्र शासनाने ओला, उबेर व इतर ॲग्रिगेटर्स कंपन्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्या विचारात घेऊन ॲप आधारित वाहनांच्या प्रचलनाकरिता महाराष्ट्र मोटार वाहन समुच्चयक नियमावली करण्यासाठी सेवानिवृत्त अप्पर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. नागरिकांची मते व अभिप्राय विचारात घेऊन मसुदा तयार करण्यात येणार आहे.  याबाबत नागरिकांचे अभिप्राय मागविण्यात आले असून, २०० हून अधिक प्रतिक्रीया आल्या आहेत. त्यामध्ये सर्वाधिक तक्रारी भाडे नाकारण्याबाबत आहेत.  

टॅग्स :टॅक्सीमुंबईओलाउबर