मुंबई : टांझानियाला परतणाऱ्या प्रवासी महिलेकडून मंगळवारी मध्यरात्री कस्टमच्या एअर इंटेलिजन्स युनिटने (एआययू) तब्बल ७४ किलो मेथाकॉलीन तथा मॅन्ड्रेक्स हस्तगत केले. या अमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत साडेसात कोटी असल्याचे सांगण्यात आले. चंबो फतमा बसील असे प्रवासी महिलेचे नाव असून, तिला अटक करण्यात आली आहे. एआययूचे अपर आयुक्त मिलिंद लांजेवार यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, या आफ्रिकन महिलेकडे सापडलेल्या पांढऱ्या पावडरबाबत स्पष्टीकरण देता आले नाही. ही पावडर मेथाकॉलीन असावी, असा संशय आहे. ती पावडर हैदराबादेतील केंद्रीय न्यायवैद्यक प्रयोगशाळेत धाडण्यात आली आहे. प्रवासी महिलेने टांझानियात व्यवसाय करीत असल्याचा दावा केला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी व्यावसायिक बैठकांसाठी ती भारतात आली होती. काही दिवस दिल्लीत वास्तव्य केल्यानंतर ती सुमारे चार दिवसांपूर्वी मुंबईत नातेवाइकाकडे आली. ही पावडर नातेवाइकानेच आपल्या बॅगांमध्ये भरल्याचे तिने एआययू अधिकाऱ्यांना सांगितले आहे.दरम्यान, विमान प्रवासात ३५ किलोपर्यंतच सामान नेता येते. त्यापुढे जादाचे सामान नेण्यासाठी विमान कंपनीला पैसे भरावे लागतात. या प्रवासी महिलेने तब्बल एका लाख रुपये कतार एअरवेजकडे भरल्याची पावती एआययू अधिकाऱ्यांना सापडली आहे. हे एक लाख रुपये याच नातेवाइकाने दिल्याचे तिने चौकशी सांगितल्याची माहिती मिळते. ही महिला अमली पदार्थांच्या तस्करीत सराईत असावी, असा संशय एआययूला आहे. (प्रतिनिधी)
आफ्रिकन तरुणीकडून ७.५ कोटींचे मॅन्ड्रेक्स जप्त
By admin | Updated: June 18, 2015 02:45 IST