Join us

पैसे मोजण्याच्या बहाण्याने लुटले ७२ हजार, फसवणुकीचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 2:56 AM

बँकेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या तरुणीला बोलण्यात गुंतवून तिच्याकडील ७२ हजार रुपयांवर ठगांनी डल्ला मारल्याचा प्रकार पवईत घडला. ही बाब तरुणीला समजताच, तिने पवई पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

मुंबई : बँकेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या तरुणीला बोलण्यात गुंतवून तिच्याकडील ७२ हजार रुपयांवर ठगांनी डल्ला मारल्याचा प्रकार पवईत घडला. ही बाब तरुणीला समजताच, तिने पवई पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून पवई पोलिसांनी अनोळखी इसमाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.साकीविहार रोड परिसरात तेजस्वी गोसावी (२४) कुटुंबीयांसोबत राहते. तेथीलच एका कंपनीत ती अकाउंटंट म्हणून नोकरीस आहे. २८ तारखेला सकाळी साडेनऊच्या सुमारास कंपनीच्या खात्यावर सव्वातीन लाख रुपये जमा करण्यासाठी जवळच्या बँकेत गेली. बँकेमध्ये पैसे जमा करण्याच्या काउंटरवर रांगेत उभी असताना, एका तरुणाने स्लिपवर नोटांचे क्रमांकही लिहिणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्यानुसार, तिने नोटांचे बंडल काढून स्लिपवर नोटांचे क्रमांक लिहिण्यास सुरुवात केली. त्याच दरम्यान, शिताफीने ठगांनी त्यातील ७२ हजार रुपये लंपास केले. तरुणी पैसे भरण्यासाठी पुढे जाताच त्यात ७२ हजार रुपये कमी असल्याचे दिसून आले. माहिती देणारे ठगही गायब असल्याने तिने पवई पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी अनोळखी इसमाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :गुन्हा