Join us  

‘सी व्हिजिल’ अ‍ॅपवर झाल्या आचारसंहिता भंगाच्या ७१७ तक्रारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 6:54 AM

नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी आॅनलाइन दाखल करता याव्यात, म्हणून निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या ‘सी व्हिजिल’ अ‍ॅपवर तक्रारींचा पाऊस पडू लागला आहे.

मुंबई : नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी आॅनलाइन दाखल करता याव्यात, म्हणून निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या ‘सी व्हिजिल’ अ‍ॅपवर तक्रारींचा पाऊस पडू लागला आहे. आतापर्यंत या अ‍ॅपवर ७१७ तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी २९४ तक्रारींमध्ये तथ्य आढळल्याने कार्यवाही केल्याची माहिती आयोगाने दिली आहे.अ‍ॅपवर प्राप्त तक्रारींपैकी आचारसंहिता भंग झाल्याच्या ३६ तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करण्यात येत असून ३८७ तक्रारी या आचारसंहितेशी संबंधित नसल्याने त्यावर कार्यवाही करण्यात आली नाही. प्राप्त तक्रारींपैकी सर्वाधिक २३० तक्रारी या विनापरवाना लावण्यात आलेले पोस्टर, बॅनर संदर्भातील आहेत. तर ४४ तक्रारी संपत्ती विद्रूपीकरण केल्याबाबत, भेटवस्तू किंवा कुपनचे वाटप केल्याने २२, मद्याचे वाटप केले म्हणून १८, पैशांचे वाटप केल्याविरोधात ३८ आणि पेड न्यूजविरोधात ४१ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यासह धार्मिक किंवा सामाजिक भाषणाविरोधात ३, प्रचारफेरीसाठी नागरिकांची वाहतूक अडवल्याविरोधात आणि निर्धारित वेळेनंतर ध्वनिक्षेपकाचा वापर केल्याविरोधात प्रत्येकी ५ तक्रारी पुढे आल्या आहेत. विनापरवाना वाहनांच्या वापरावरूनही अ‍ॅपवर १९ तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे शस्त्रप्रदर्शन किंवा दहशतीचे वातावरण केल्याविरोधात ७ तक्रारींची नोंद आहे.तक्रारींमध्ये पुणे आघाडीवरअ‍ॅपवर आलेल्या एकूण तक्रारींमध्ये सर्वाधिक म्हणजे १३३ तक्रारी या पुणे जिल्ह्यातून आल्या आहेत. त्याखालोखाल ठाण्यातून ६८, सोलापूरमधून ६१, मुंबई उपनगरातून ४५ तर मुंबई शहरातून ४१ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्याखालोखाल नांदेड जिल्ह्यात ३६, अहमदनगरमध्ये ३५, जळगाव २०, लातूर ११, नागपूर ३०, अकोल्यात ११, अमरावतीमध्ये ११, औरंगाबादमध्ये १२, नाशिक २२, पालघर २४, सांगली १७, सातारा ११, सिंधुदुर्ग १९, वर्धा १४, बुलडाण्यात १३ व कोल्हापूर जिल्ह्यात १८ तक्रारींची नोंद आहे. रायगड, बीड, धुळे, गडचिरोली व भंडारा, जालना, चंद्रपूर, गोंदिया, नंदूरबार, उस्मानाबाद, रत्नागिरी, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, परभणी या जिल्ह्यांमध्ये १०हून कमी तक्रारींची नोंद आहे.

टॅग्स :निवडणूकभारतीय निवडणूक आयोग