मुंबई : तंत्रशिक्षण देण्याच्या नावाखाली राज्यातील संस्था हजारो विद्यार्थ्यांची फसवणूक करीत असल्याचे उघडकीस आले आहे. राज्यभरात ६७ तंत्रशिक्षण संस्थांना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) मान्यताच दिली नसल्याची माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाने माहिती अधिकारांतर्गत दिली आहे. यामध्ये वसंतदादा पाटील प्रतिष्ठान, इस्माइल युसूफ आणि एल्फिन्स्टन महाविद्यालयासारख्या अनेक नामांकित संस्थांचा समावेश आहे.आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ही माहिती मिळवली आहे. मान्यता नसलेल्यांत सर्वाधिक म्हणजे ३३ संस्था मुंबईतील आहेत. त्याखालोखाल नवी मुंबई १३, पुण ८, ठाणे ४, नाशिक ३, कल्याण २ आणि भिवंडी, अहमदनगर, औरंगाबाद आणि कोल्हापूर येथील प्रत्येकी एका संस्थेचा समावेश आहे.नामांकित वसंतदादा पाटील प्रतिष्ठानही मान्यताप्राप्त नाही. इस्माइल युसूफ कॉलेज आॅफ आटर््स, सायन्स अॅण्ड कॉमर्स हेदेखील याच श्रेणीत येते. फोर्ट येथील एल्फिन्स्टन महाविद्यालयही मान्यताप्राप्त नसल्याचे संचालनालयाने माहिती अधिकारात दिलेल्या उत्तरात म्हटले आहे. या प्रकारामुळे गरजू विद्यार्थ्यांची फसवणूक होत असून, त्यांना या संस्थांकडून मिळणाऱ्या प्रमाणपत्राचा काहीही लाभ होत नसल्याची खंत गलगली यांनी व्यक्त केली आहे.
राज्यातील ६७ तंत्रशिक्षण संस्था मान्यतेशिवाय सुरू
By admin | Updated: October 5, 2015 02:40 IST