Join us

शिवडी-न्हावा शेवा सागरी मार्गाचे 65 टक्के काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2022 07:32 IST

ऑर्थोट्रोपिक स्टील डेक बसविण्याचे काम सुरू : डिसेेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणार

- नामदेव मोरेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मुंबई व नवी मुंबईतील अंतर कमी करण्यासाठी शासनाने शिवडी ते न्हावा शेवा सागरी मार्गाचे काम सुरू केले आहे. या मार्गावर आर्थोट्रोपिक स्टील डेकचे गाळे बसविण्याचे काम सोमवारी सुरू करण्यात आले. या मार्गावर एकूण ३२ गाळे बसविण्यात येणार असून त्यांची निर्मिती जपान, दक्षिण कोरिया, तैवान, व्हिएतनाम व म्यानमारमध्ये करण्यात आली आहे. सागरी मार्गाचे ६५ टक्के काम पूर्ण झाले असून डिसेंबर २०२३ पर्यंत काम पूर्ण होणार आहे.

शिवडी, न्हावा शेवा सागरी मार्गावर ऑर्थोट्रोपिक स्टील डेकचे गाळे बसविण्याचे काम सोमवारी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. १७८८३ कोटी रुपये खर्च करून २२ किलोमीटर लांबीचा सागरी मार्ग तयार केला जात आहे. या मार्गावर ७.८१ किलोमीटर लांबीच्या पुलावर ऑर्थोट्रोपिक स्टील डेक बसविण्यात येत आहेत. डेकचे एकूण ३२ गाळे बसविण्यात येणार असून एका गाळ्याची लांबी ७० मीटर असून रुंदी १४.९२ किलोमीटर आहे. प्रकल्पातील पॅकेज १ व पॅकेज २ ओएसडी गाळ्यांसाठी ८७,४५२ टन पोलाद वापरण्यात आले आहे. या स्टील गाळ्यांचे काम पाच देशांतील फॅब्रिकेशन कारखान्यात केले जाते. तेथून ते कारंजा येथील जोडणी यार्डमध्ये आणले जातात व तेथे जोडणी केली जाते. ऑर्थोट्रोपिक स्टील डेकची वाहतूक करण्यासाठी ॲक्वा फ्लोट बार्ज ३३० चा वापर केला जात आहे. या बार्जची लांबी १००.५८ मीटर व रुंदी ३६ मीटर आहे. 

२२ किलोमीटर लांबीचा सागरी मार्ग

हा सागरी मार्ग २२ किलोमीटर लांबीचा आहे. मार्च २०१८ मध्ये काम सुरू झाले आहे. सहा मार्गिकांच्या मार्गाची पाण्यावरील लांबी १६.५ व दोन्ही बाजूस जमिनीवरील लांबी ५.५ किलोमीटर आहे. ऑर्थोट्रोपिक स्टील डेकच्या पहिल्या गाळ्याचे काम सुरू झाले असून ही भारतासाठी अभिमानास्पद बाब आहे.- एस. व्ही. आर. श्रीनिवास, आयुक्त एमएमआरडीएयामुळे मुंबई व नवी मुंबईचे अंतर कमी होईल. यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन मुंबई, ठाणे, रायगड हे जिल्हे एकमेकांना जोडले जाणार आहेत.- एकनाथ शिंदे, नगरविकासमंत्री