ठाणे : महापालिकेची खालावलेली आर्थिक पत सूधारण्यासाठी आणि मालमत्ताकराची वसुली योग्य व्हावी यासाठी पालिकेने घेतलेल्या प्रशासकीय कर रद्द करण्याच्या निर्णयामुळे शेवटच्या तारखेपर्यंत २० हजार करदात्यांनी सुमारे ६५ कोटींची थकबाकी भरली आहे. ही रक्कम जमा करणाऱ्यांना पालिकेने ४१ कोटी ९६ लाख ४५ हजार रुपयांची दंड माफ केला आहे. मालमत्ताकर विभागाला यावर्षी ३३५ कोटींचे टार्गेट देण्यात आले होते. यामध्ये ९६ कोटींची थकबाकी, ८६ कोटी १२ लाख प्रशासकीय आकार आणि चालू वर्षाची २३९ कोटींची मागणी यांचा समावेश आहे. ही रक्कम वसूल व्हावी यासाठी थकबाकी भरा आणि दंडात सुट मिळावा अशी भूमिका प्रशासनाने घेतली होती. मालमत्ताकर वसूलीचे उद्दीष्ट असलेल्या रकमेपैकी १५२ कोटी ५८ लाख आतापर्यंत जमा झाले आहेत. पालिका दोन टप्प्यात करवसूली करीत असली तरी कर न भरणाऱ्यांची संख्यादेखील मोठी आहे. डिसेंबर २०१४ पर्यंत थकबाकीसह चालू वर्षाची रक्कम भरणाऱ्यांना प्रशासकीय आकार माफ करण्याची तयारी प्रशासनाने दाखवली़ मात्र त्यास अल्प प्रतिसाद असल्याचे बघून ही मुदत १५ फेब्रुवारी २०१५ पर्यंत वाढवण्यात आली होती. त्यानुसार २० हजार मालमत्ताधारकांनी या योजनेचा फायदा घेतला़ यामुळे पालिकेचे मालमत्ताकर वसुलीचे उद्दीष्ट जवळपास पूर्णत्त्वाच्या वाटेवर दिसत असले तरी मार्च अखेर ही मुदत वाढवल्यास अधिकची करवसुली होऊ शकणार आहे. (प्रतिनिधी)