Join us
Daily Top 2Weekly Top 5

६४ नको ६२च बरे..! सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याच्या महापालिकेच्या निर्णयाला अध्यापकांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2023 10:08 IST

आपल्या अखत्यारितील मेडिकल महाविद्यालयांच्या अध्यापकांचे सेवानिवृत्तीचे वय ६२ वरून ६४ करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतल्याचे वृत्त सर्वप्रथम  ‘लोकमत’ने दिले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयांतील अध्यापकांचे सेवानिवृत्तांचे वय ६२ वरून ६४ करण्याच्या मुंबई महापालिकेच्या निर्णयाला कडाडून विरोध होत आहे. महापालिकेच्या या निर्णयाविरोधात अध्यापकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. सेवानिवृत्तीचे वय वाढवले जाऊ नये, यासाठी अध्यापकांनी अलीकडेच स्वाक्षरी मोहीम राबवली होती. मात्र, मंगळवारी महापालिकेने परिपत्रक जारी करत सेवानिवृत्तीचे वय वाढविले. महापालिका वैद्यकीय शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी शुक्रवार, ३ मार्च रोजी आयुक्तांना भेटून निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी निवेदन देणार आहेत.

आपल्या अखत्यारितील मेडिकल महाविद्यालयांच्या अध्यापकांचे सेवानिवृत्तीचे वय ६२ वरून ६४ करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतल्याचे वृत्त सर्वप्रथम  ‘लोकमत’ने दिले होते. या निर्णयाचे पडसाद सर्व महाविद्यालयांत उमटले. महापालिका वैद्यकीय शिक्षक संघटनेने तत्काळ बैठक बोलाविली. त्यामध्ये सर्व पाच महाविद्यालयांचे प्रतिनिधी हजर होते. त्यावेळी या बैठकीत प्रथम सनदशीर मार्गाने या निर्णयाला विरोध करण्याचे निश्चित झाले. आयुक्तांना भेटून निवेदन देण्याचे ठरले. त्यानंतर प्रतिसाद काय मिळतो, यावर भूमिका काय घ्यायची, हे ठरले. नजीकच्या काळात काही प्राध्यापक वयाची बासष्टी पूर्ण करत आहेत. या सर्वांची सोय लावण्यासाठी निर्णय घेण्यात आल्याची चर्चा सध्या सर्व वैद्यकीय महाविद्यालयांत सुरू आहे. ज्या अध्यापकांना पदोन्नती मिळणार होती, त्यांना या निर्णयाचा फटका बसणार आहे. 

महापालिकेच्या अखत्यारितील महाविद्यालये     टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज (नायर रुग्णालय)     सेठ गोर्धनदास सुंदरदास मेडिकल कॉलेज (केईएम रुग्णालय)     लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज (सायन रुग्णालय)     हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मेडिकल कॉलेज (कूपर रुग्णालय)      नायर डेंटल कॉलेज 

केवळ ५ ते १० निवडक प्राध्यापकांना या सेवानिवृत्ती वयवाढीच्या निर्णयाचा फायदा होणार आहे. सेवानिवृत्ती वय वाढ करू नये, असे आम्ही यापूर्वी प्रशासनाला कळविले होते. यामुळे ज्या प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापकांची पदोन्नती होणार होती, त्याला वेळ लागणार आहे. याप्रकरणी आम्ही आयुक्तांना भेटून निवेदन देणार आहोत. सकारात्मक निर्णय न झाल्यास कोर्टात न्याय मागू.- डॉ. रवींद्र देवकर, सरचिणीस, महापालिका वैद्यकीय शिक्षक संघटना

टॅग्स :मुंबई महानगरपालिका