लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पावसाचे पाणी मुंबईत अनेक भागांमध्ये तुंबल्याने याचा फटका रस्ते वाहतुकीला बसला. काही रस्ते पाण्याखाली गेल्याने तेथील बस मार्ग वळविण्यात आले. तर तब्बल ६१ बसगाड्यांमध्ये बिघाड झाल्यामुळे त्या बंद पडल्या.
सायन रस्ता क्रमांक २४, चेंबूर फाटक, अंधेरी सबवे, गांधी मार्केट, हिंदमाता सिनेमा, वडाळा पूल अशा अनेक भागांमध्ये पाणी तुंबले. यामुळे बसगाड्यांच्या मार्गात अडथळा निर्माण झाला. पावसाचे पाणी शिरल्यामुळे ६१ ठिकाणी बसगाड्या बंद पडल्या. यामुळे प्रवाशांचे हाल झाले. अखेर बेस्टमार्फत यापैकी ५९ बसगाड्यांची दुरुस्ती करून त्या रस्त्यावरून हलविण्यात आल्या.
सांताक्रूझ शाळेजवळ भरले पाणी
सांताक्रूझ येथील पानबाई इंटरनॅशनल स्कूलजवळच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व्हिस रोडवर शुक्रवारी सकाळी पाणी भरले होते. रस्त्यालगतच्या बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी सोडण्यात येत असल्याने याठिकाणी पाणी तुंबले. याबाबत अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराला पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य ते निर्देश द्यावेत, अशी सूचना महापौरांनी केली.
मेट्रोच्या कामामुळे पर्जन्य जलवाहिनीचे नुकसान
मेट्रोच्या कामामुळे सांताक्रूझ येथे पर्जन्य जलवाहिनीला बाधा पोहोचली आहे. याबाबत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना कळवून तत्काळ पर्जन्य जलवाहिनीची दुरुस्ती करण्याचे निर्देश महापौरांनी दिले आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिका अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे.