Join us

मुंबईत ६ हजार सीसीटीव्ही

By admin | Updated: February 8, 2015 01:55 IST

तब्बल सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मुंबईत ६ हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या करारावर शनिवारी राज्य शासन आणि एल अँड टी कंपनी यांच्यात करार झाला.

मुंबई : तब्बल सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मुंबईत ६ हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या करारावर शनिवारी राज्य शासन आणि एल अँड टी कंपनी यांच्यात करार झाला. त्यापैकी ५०० कॅमेरे मुंबईतील वाहतूक व्यवस्थेवर लक्ष ठेवतील तर उर्वरित कॅमेरे शहराच्या सुरक्षेची काळजी वाहतील. पुढील दोन वर्षांत हे कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.मुंबईत कॅमेरे बसवण्याच्या ९४५ कोटी रुपये खर्चाच्या कामासंंबंधीच्या करारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व एल अँड टी कंपनीचे अध्यक्ष ए.एम. नाईक यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. मुंबईवर सात वर्षांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता. मात्र गेल्या पाच वर्षांत याकरिता तीनवेळा निविदा मागवूनही सरकारला अपयश आले. एल अँड टी कंपनीने या कामाकरिता १,०७५ कोटी रुपयांची निविदा दाखल केली होती. परंतु सरकारने वाटाघाटी करून निविदेची रक्कम ९४५ कोटी रुपये इतकी कमी करून घेतली. (विशेष प्रतिनिधी)