Join us  

‘नायर’च्या मातृदुग्ध पेढीत ६०० दात्यांनी केले दुग्धदान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 6:01 AM

दान दिल्याने वाढते. त्यामुळे विविध स्वरूपाच्या दानाची चर्चा होताना अवयवदान, रक्तदान, देहदान याबद्दल बोलले जाते. परंतु दुग्धदानाबद्दल अजूनही आपल्याकडे फारशी जनजागृती नाही.

मुंबई : दान दिल्याने वाढते. त्यामुळे विविध स्वरूपाच्या दानाची चर्चा होताना अवयवदान, रक्तदान, देहदान याबद्दल बोलले जाते. परंतु दुग्धदानाबद्दल अजूनही आपल्याकडे फारशी जनजागृती नाही. ज्या बालकांना मातेचे दूध पुरेशा प्रमाणात मिळते, त्यांना संभाव्य आजार होण्याची शक्यता कमी असते, त्यामुळे दुग्धदानाबद्दल जनजागृती आवश्यक आहे. मातृदुग्ध पेढीच्या संकल्पनेला अधिकाधिक चालना देण्यासाठी पालिकेच्या नायर रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या मातृदुग्ध पेढीमध्ये गेल्या वर्षभरात ६०० मातांनी दुग्धदान केले आहे. सकारात्मक बाब म्हणजे यातील २३५ हून अधिक माता पुनर्दात्या आहेत.जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, मातेचे दूध न मिळाल्यामुळे जगात सुमारे १६ लाख बालकांचा मृत्यू होतो. जे बाळ आपल्या मातेचे दूध घेऊ शकत नाहीत, अशा बाळांना आपल्याच मातेचे किंवा मातृदुग्ध पेढीतले दूध सर्वात उत्तम असते. नायर रुग्णालयातील मातृपेढी ही पालिका रुग्णालयातील सातवी पेढी आहे. या मातृदुग्ध पेढीच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात ४०० नवजात बालकांना लाभ झाला आहे. या पेढीत दर दिवशी सरासरी १ ते दीड लीटर दूध दान केले जाते. तसेच, ३ ते ५ दाते या पेढीत दान करतात अशी माहिती नायर रुग्णालयाच्या बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. सुषमा मलिक यांनी दिली.डॉ. मलिक म्हणाल्या की, मातृदुग्ध पेढीत दुग्धदानासाठी येणाऱ्या मातांचे पूर्व परीक्षण करण्यात येते. त्यात कोणताही आजार, कमतरता नाही याची पडताळणी करून मगच दानासाठीची पात्रता ठरविण्यात येते. या पेढीत येणारे ऐच्छिक दाते असतात, यातील दात्यांना पोषक आहार म्हणून दुग्धदानानंतर अंडे, दूध आणि केळी देण्यात येतात.

अशी आहे दुग्धदानाची प्रक्रियामातृदुग्धपेढीत अन्य गर्भवती मातांकडून दूध घेऊन ते संकलित केले जाते. या दुधाची तपासणी, प्रक्रिया केल्यानंतर गरजू नवजात बालकांना ते देण्यात येते.हे दूध अशा बालकांसाठी वापरले जाते. ज्यांचा या मातांशी कुठलाही नातेसंबंध नसतो.अनेकदा महिलेची प्रसूती झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच बाळाला दूध पाजावे लागते.मातेला दूध येत नसल्याने अशा बाळांसाठी मातृदुग्धपेढी हा एकमेव पर्याय असतो. या पेढीच्या माध्यमातून अन्य मातांनी दान केलेले दूध बाळाला दिले जाते.

‘त्या’ मातेने केले ५५ वेळा दुग्धदान ! : मुंबईकर असणाºया मातेने नायरच्या मातृदुग्धपेढीत तब्बल ५५ वेळा दुग्धदान केले आहे. या मातेची मूदतपूर्व प्रसूती झाली आहे. गेले ६३ दिवस हे नवजात बालक याच रुग्णालयातील बाल अतिदक्षता विभागात दाखल आहे. अशा परिस्थितीतही आपल्या बाळाच्या स्थितीकडे पाहून अन्य बालक केवळ मातेच्या दुधापासून वंचित राहू नये या हेतूने ही माता रोजच्या रोज गेले ५५ दिवस नियमितपणे दुग्धदान करत आहे.मातृदुग्धपेढीच्या माध्यमातून आजारी असणाºया किंवा मुदतपूर्व प्रसूती झालेल्या नवजात बालकांना दुग्धदानाद्वारे नवसंजीवनी मिळते. गेल्या वर्षभरात पालकांनी सोडून दिलेल्या चार नवजात बालकांनाही या पेढीच्या माध्यमातून मातेचे दूध मिळाले होते. त्यामुळे ही मातृदुग्धपेढी अनेक चिमुकल्यांसाठी वरदान ठरत आहे.- डॉ. रमेश भारमल,अधिष्ठाता, नायर रुग्णालय

टॅग्स :दूध