Join us  

मुंबई पोर्ट ट्रस्टचे ६०० खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 4:15 AM

संजय भाटिया यांची माहिती; वर्षभरात पूर्ण होणार पहिला टप्पा

मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्टने मुंबईकरांच्या सेवेसाठी अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी युक्त ६०० खाटांचे रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील महिनाभरात या रुग्णालयाच्या निर्मितीला प्रारंभ होईल. वर्षभरात रुग्णालयाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होईल, तर रुग्णालयाचे संपूर्ण काम साडेचार वर्षांत पूर्ण होईल, असा विश्वास मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी व्यक्त केला.सध्या मुंबई पोर्ट ट्रस्टचे २४१ खाटांचे रुग्णालय आहे. या रुग्णालयाचा विस्तार करून ते ३०० खाटांचे करण्यात येईल. याच्या जोडीलाच येथे आणखी ३०० खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय बांधण्यात येणार आहे. अशा प्रकारे एकूण ६०० खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय रुग्णसेवेसाठी उपलब्ध होईल.या रुग्णालयाच्या कामासाठी सुमारे ६९३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हे काम खासगी-सार्वजनिक भागीदारी पद्धतीने करण्यात येणार आहे. ६०० खाटांच्या या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात ४० खाटा अतिदक्षता विभाग (आयसीयूसाठी), २५ खाटा अपघातग्रस्तांसाठी उपलब्ध करून देण्यात येतील, असे भाटिया यांनी सांगितले.याशिवाय मॉड्युलर आॅपरेशन थिएटर, कॅथलॅबसह स्वतंत्र आॅपरेशन थिएटर, रेडिओलॉजी, सिटीस्कॅन, मॅमोग्राफी, अल्ट्रासाउंड, डिजिटल एक्स-रेसह सर्व सुविधा उपलब्ध असतील. जवळपास सर्व आजारांवर येथे उपचार केले जातील. रुग्णालयाच्या उभारणीनंतर हे रुग्णालय देशातील सर्वोत्तम रुग्णालयातील एक रुग्णालय ठरेल, असा विश्वास भाटिया यांनी व्यक्त केला.

टॅग्स :हॉस्पिटल