Join us

कृत्रिम तलावात ६०% विसर्जन; कोरोनाचे विघ्न दूर करण्याचे साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 02:04 IST

यंदाच्या गणेशोत्सवात दरवर्षीप्रमाणे मोठ्या मिरवणुका नव्हत्या, ध्वनिप्रदूषण-वायुप्रदूषणही तुलनेने कमी असल्याचे जाणवत होते.

मुंबई : प्रत्येक संकट आपल्याबरोबर एक नवीन बदल घेऊन येत असते. अशा आपत्तीतून लढण्याची शक्ती आणि सकारात्मक दृष्टिकोन तयार होत असतो. असाच आमूलाग्र बदल कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्तात झालेल्या दीड दिवसांच्या गणेशमूर्तीच्या विसर्जनावेळी दिसून आला.

चौपाट्यांवर प्रवेश बंदी असल्याने एकूण ४० हजारपैकी ६० टक्के गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये झाले. यामध्ये फिरता कृत्रिम तलाव तुमच्या दारी या मोहिमेला भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला. कोरोनारूपी विघ्न दूर कर, असे साकडे घालत मुंबईकरांनी गणरायाचे घरोघरी स्वागत केले.

सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी आगमन व मिरवणुकीवर महापालिकेने बंदी घातली आहे. त्यामुळे अत्यंत साधेपणाने मुंबईकरांनी दीड दिवसांच्या आपल्या लाडक्या गणरायाला रविवारी निरोप दिला. यावर्षी बहुतांश लोकांनी गणेशमूर्तीचा आकार चार फुटांहून कमी ठेवल्याचे दिसून आले. तसेच अनेकांनी शाडू मातीची मूर्ती तसेच इकोफ्रेंडली गणेशमूर्तींवर भर दिला. 

यंदा १७० कृत्रिम तलाव तयार करण्यात आले होते. तसेच काही विभागांमध्ये फिरत्या वाहनातील कृत्रिम तलावांची सोय करण्यात आली होती. एक फोन केल्यास इमारतीच्या प्रवेशद्वारावर पालिकेची फिरती वाहने उभी राहिल्याने नागरिकांसाठीही ते सोयीचे ठरले.सोमवारपर्यंत एकूण ४० हजार ८२३ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यापैकी कृत्रिम तलावांवर ७१० सार्वजनिक आणि २२ हजार १४९ घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. फिरत्या वाहनांना चांगला प्रतिसाद मिळाला. सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी महापालिकेने फिरत्या वाहनांची सोय  केली होती. कुठे टेम्पो तर कुठे ट्रकवर कृत्रिम तलाव तयार करून विभागांमध्ये फिरवण्यात आला. एक फोन करताच दारात ट्रक उभा होत असल्याने भाविकांनाही पूजाअर्चना करीत आपल्या गणेशमूर्तींचे विसर्जन करता येत होते. त्यामुळे नागरिकांकडून या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळाला.लवकर व कमी वेळेत विसर्जन..यंदाच्या गणेशोत्सवात दरवर्षीप्रमाणे मोठ्या मिरवणुका नव्हत्या, ध्वनिप्रदूषण-वायुप्रदूषणही तुलनेने कमी असल्याचे जाणवत होते. दरवर्षी अनुभवायला येणारी वाहतूक कोंडीसुद्धा यंदा नव्हती. तर समुद्र-तलाव-खाडी इत्यादी ठिकाणी महापालिकेने केलेल्या आवाहनानुसार स्वत: श्रीगणेशमूर्तीं विसर्जनासाठी न जाता आपल्या लाडक्या बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन हे महापालिकेच्या कर्मचारी, स्वयंसेवक यांच्याद्वारे केले.

टॅग्स :गणेशोत्सव