Join us

रिसॉर्टस्मध्ये बुडून ६ वर्षीय मुलाचा मृत्यू

By admin | Updated: May 12, 2014 05:32 IST

अर्नाळा येथील स्वागत रिसॉर्ट येथे सहलीकरीता आलेल्या एका ६ वर्षीय मुलाचा जलतरण तलावात बुडून मृत्यू झाला.

वसई : अर्नाळा येथील स्वागत रिसॉर्ट येथे सहलीकरीता आलेल्या एका ६ वर्षीय मुलाचा जलतरण तलावात बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.अमर इमरान शेख (६, रा. कुर्ला, मुंबई) हा आपल्या कुटूंबासमवेत अर्नाळा येथे सहलीकरीता आला होता. सकाळी ११.३० च्या सुमारास या रिसॉर्टस्मधील जलतरण तलावामध्ये त्याचा बुडून मृत्यू झाला. यावेळी जलतरण तलावानजिक लाईफगार्ड नसल्याचे सांगण्यात येत आहे. यापुर्वीही याच भागातील अनेक रिसॉर्टस्मध्ये अनेकजण बुडून मृत्यू पावल्याच्या घटना घडल्या होत्या. परंतु या रिसॉर्टस्मधील सोयी-सुविधांबाबत योग्य ती कार्यवाही आजवर झालेली नसल्याने अशा घटना वारंवार घडत असतात. वास्तविक लहान मुले जलतरण तलावात पोहाण्यास उतरली असता तलावाच्या परिसरात लाईफगार्डची उपस्थिती आवश्यक असते. परंतु अनेक रिसॉर्टस्मध्ये याकडे लक्ष दिले जात नाही. येथील सर्व रिसॉर्टस् अनधिकृतरित्या व्यवसाय करीत आहेत. काही महिन्यापुर्वी कळंब येथे एका रिसॉर्टस्मध्ये एका पे्रमी युगुलाची हत्या झाली होती. त्यानंतर या सर्व रिसॉर्टस्वर कारवाई व्हावी अशा मागणीने जोर धरला होता. परंतु आजतागायत या रिसॉर्टस्वर महसुल प्रशासनाने कारवाई केली नाही. महसुल अधिकार्‍यांवर राजकीय दबाव आल्यामुळेच ही कारवाई टाळण्यात आल्याची चर्चा आजही सर्वत्र होत आहे. या कळंब गावातील अनधिकृत रिसॉर्टस् पुन्हा जोमाने सुरू झाले आहेत. दरमहा लाखो रू. चा मलीदा महसुल व पोलीसयंत्रणेला मिळत असल्यामुळे या गैरप्रकारावर कुणीही कारवाई करण्यास तयार नाही असे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे. कळंब येथील अनधिकृत रिसॉर्टस्मध्ये मोठ्या प्रमाणात अनैतिक व्यवसाय होत असतात व त्यामधूनच अनेक दुर्दैवी घटना घडतात. अशा रिसॉर्टस्मधील रुम संस्कृतीमुळे येथील गावामध्ये कायदा व सुव्यवस्थेची स्थितीही दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. (प्रतिनिधी)