Join us  

आर.टी.ई.नुसार खासगी शाळांमध्ये ६ हजार ४६३ जागा; जाणून घ्या कसा कराल अर्ज...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2021 3:03 AM

प्रवेशास सुरुवात, अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ मार्च

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘शिक्षणाचा अधिकार अधिनियम - २००९’ वंचित व दुर्बल घटकांतील मुलांसाठी ३५२ पात्र खासगी विना अनुदानित शाळांमध्ये २५ टक्के आरक्षित कोट्यातून ६ हजार ४६३ जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे पालकांनी प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून २१ मार्च, २०२१ पर्यंत अर्ज करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.असा करावा अर्ज...

प्रवेशासाठी शासनाच्या student.maharashtra.gov.in (www नाही) या संकेतस्थळावरून किंवा education.maharashtra.gov.in (www नाही) या ‘सरल’च्या वेबसाइटमधील ‘विद्यार्थी’ (Student) या टॅबमधील RTE पोर्टलवरून ऑनलाइन अर्ज भरावेत. अर्जासोबत कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही. पालकांना या प्रवेश प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये, याकरिता संपूर्ण मुंबईत ४१ मार्गदर्शक मदत केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. यासाठी पालकांनी संकेतस्थळावरील Help Desk या विकल्पावर Mumbai BMC हा जिल्हा निवडून सदर मदत केंद्रांची यादी पाहावी. येथे मोफत अर्ज भरण्याची सुविधा आहे.

स्वतःहून तसेच इतर कोणत्याही ठिकाणाहून ऑनलाइन व Moblile App द्वारे अर्ज करणाऱ्या पालकांना मदत केंद्रावर येण्याची गरज नाही. यापूर्वी आर.टी.ई. २५ टक्केअंतर्गत शाळेत प्रवेश घेतलेल्या मुलांना  पुन्हा अर्ज करता येणार नाही. प्रवेश अर्ज भरताना याबाबत चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्याचे आढळल्यास प्रवेश रद्द केला जाईल.

टॅग्स :शिक्षण हक्क कायदा