Join us

मुंबईतील दर १० पैकी सहा महिलांना अ‍ॅनिमिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 00:53 IST

दर महिन्याला होत असलेल्या रक्तस्रावामुळे पाळी येणाऱ्या मुली आणि महिलांमध्ये जास्त कमतरता आढळते. सुस्तपणा, अकारण थकवा, निस्तेज त्वचा आणि निस्तेज डोळे ही अ‍ॅनिमियाची काही सामान्यपणे दिसून येणारी लक्षणे आहेत.

मुंबई : अ‍ॅनिमियासंदर्भात नुकत्याच केल्या गेलेल्या एका अभ्यासानुसार, देशातील ३६ शहरांमधील १० पैकी ६ महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असून लोहाची कमतरता म्हणजेच अ‍ॅनिमिया असल्याचे आढळून आले. जेव्हा निरोगी लाल रक्तपेशींची किंवा रक्तामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता होते तेव्हा अ‍ॅनिमिया होतो. २०-५० वयोगटात अ‍ॅनिमियाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे नोंदविण्यात आले आहे. या अभ्यासासाठी दोन वर्षांच्या कालावधीत १७ लाख मुली आणि महिलांच्या रक्ताचे नमुने तपासले.

मुंबईत २०-५० वयोगटात अ‍ॅनिमियाचे सर्वाधिक प्रमाण असल्याचे आढळून आले. याविषयी, डॉ. मयूर निगल्ले म्हणाले, लोहाची कमतरता हे अ‍ॅनिमियाचे मुख्य कारण असून पूरक आहार (सप्लिमेंट्स) आणि चांगल्या पोषणाद्वारे त्यावर मात करता येते. परंतु, भारतात महिला अ‍ॅनिमिया घेऊन जगतात.

दर महिन्याला होत असलेल्या रक्तस्रावामुळे पाळी येणाऱ्या मुली आणि महिलांमध्ये जास्त कमतरता आढळते. सुस्तपणा, अकारण थकवा, निस्तेज त्वचा आणि निस्तेज डोळे ही अ‍ॅनिमियाची काही सामान्यपणे दिसून येणारी लक्षणे आहेत. मुलांमध्ये अ‍ॅनिमियाचे स्वरूप तीव्र असल्यास त्यांना घाण, चिकणमाती आणि इतर असामान्य पदार्थ खाण्याची इच्छा होते. याला ‘पिका’ असे म्हणतात. अशा प्रकारचे वर्तन धोकादायक नसून अ‍ॅनिमिया बरा झाला की ते थांबते.