Join us

विद्यार्थ्याला ६ लाखांचा गंडा

By admin | Updated: June 18, 2015 01:05 IST

सध्या सगळीकडे महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेचे वारे वाहत असताना आसाम येथील विद्यार्थ्याला मुंबईतील नामांकित के.जे. सोमय्या विद्यालयात

मुंबई : सध्या सगळीकडे महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेचे वारे वाहत असताना आसाम येथील विद्यार्थ्याला मुंबईतील नामांकित के.जे. सोमय्या विद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली ६ लाखांचा गंडा घालण्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या मालमत्ता कक्षाने दोन ठगांना अटक केली आहे. अश्विन शामानंद झा ऊर्फ रोशन सिंग आणि अमित शाकलेश दुबे अशी आरोपींची नावे असून दोघांनाही ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.मूळचे बिहार येथील रहिवासी असलेले सिंग आणि दुबे यांनी इंजिनीअरिंग शिक्षण घेतले आहे. मागील दोन महिन्यांपासून ते नवी मुंबईतील सीवूड येथे भाड्याने राहत होता. मुळात शाळा-महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेदरम्यान हे दोघे ठग शाळा प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली मुंबईत येत असल्याचे उघड झाले. अशाच प्रकारे मूळचा आसाम येथील गुवाहाटीचा रहिवासी असलेला ज्युलियो हेमंत फर्नांडिस त्यांच्या जाळ्यात अडकला. विद्याविहार येथील के.जे. सोमय्या विद्यालयात पी.जी.डी.एम. या कोर्ससाठी मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याचे आमिष या ठगांनी त्याला दाखवले. ५ जून रोजी खार येथे बोलावून या तरुणांकडून सुरुवातीला २ लाख उकळले. त्यापाठोपाठ ९ जून रोजी सोमय्या विद्यालयाकडे बोलावून ४ लाख असे एकूण ६ लाख रुपये घेऊन या ठगांनी पोबारा केला. पैसे दिल्यानंतर फर्नांडिसने आरोपींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, दोघांनी मोबाइल बंद केलेला आढळून आला. अशात आरोपींचा संपर्क तुटला. त्यात त्यांनी दिलेला पत्ताही चुकीचा निघाला. यात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फर्नांडिस याने खार पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दिली. गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त अतुलचंद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्या पथकाने आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. दोघे ठग सीवूड येथे येणार असल्याची माहिती मालमत्ता कक्षाचे उपनिरीक्षक डी. बने यांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून दोन्हीही आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या. या ठगांकडील चोरीस गेलेली सहा लाखांची रोकड जप्त करण्यात मालमता कक्षाला यश आले. आरोपींकडून ११ व्हिजिटिंग कार्ड आणि ३ मोबाइल फोनसह इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. प्रवेशाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या आरोपींपासून सावध राहाण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. (प्रतिनिधी)