ठाणे : तलावांचे शहर म्हणून ओळख असलेल्या शहरातील ६ तलावांच्या सुशोभीकरणास राज्य शासनाने हिरवा कंदील दाखवला आहे. या कामासाठी २३.५५ कोटींचा निधीही मंजूर केला आहे. राष्ट्रवादीचे आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रयत्नांनंतर गुरुवारच्या राज्य शासनाच्या तलाव संवर्धन सुकाणू समितीच्या बैठकीत पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मंजूरी दिली. ठाणे महापालिका हद्दीतील सर्व तलावांचे सुशोभिकरण व्हावे यासाठी आ. डावखरे यांच्या पाठपुराव्यानंतर पालिका प्रशासनाने तसा प्रस्ताव राज्य शासनाच्या तलाव संवर्धन सुकाणू समितीकडे सादर केला. मात्र समितीने त्यात तांत्रिक त्रुटी काढून हा प्रस्ताव पुन्हा ठाणे महापालिका प्रशासनाच्या पाठवला होता. त्यानंतर डावखरे यांनी पालिका अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्या त्रुटी दूर करुन पुन्हा राज्य शासनाकडे तलाव सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव पाठवला होता. या विषयासंदर्भात नागपूर अधिवेशनात प्रशासनाचे लक्ष्य वेधले. अखेर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या सूचनेनंतर तलाव संवर्धन सुकाणू समितीच्या बैठकीत हा विषय येऊन ठाणे शहरातील मासुंदा तलाव, हरिओम नगर तलाव, जेल तलाव, घोडबंदर रोड येथील तुर्भे पाडा तलाव, नार तलाव, कावेसर तलाव या यांचे सुशोभिकरण करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यासाठी २३.५५ कोटी रुपये खर्च होणार आहेत. या योजनेंतर्गत तलावातील पाण्याचा दर्जा तपासणे, तलावातील गाळ काढणे, तलावातील पाण्याचे शुध्दीकरण करणे, तलाव सभोवतालच्या परिसराचे सौंदर्यीकरण करणे आदी कामे केली जाणार आहे. त्यामुळे मुंबईत येणारे पर्यटक ठाणे शहराकडे आकर्षिले जातील अशी माहिती डावखरे यांनी दिली. (प्रतिनिधी)४राष्ट्रवादीचे आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रयत्नांनंतर गुरुवारच्या राज्य शासनाच्या तलाव संवर्धन सुकाणू समितीच्या बैठकीत पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मंजूरी दिली.४या अंतर्गत तलावातील पाण्याचा दर्जा तपासणे, तलावातील गाळ काढणे, तलावाबाजूच्या परिसराचे सौंदर्यीकरण करणे ही कामे होतील.
६ तलावांचे सुशोभीकरण
By admin | Updated: February 5, 2015 22:51 IST