सुरेश लोखंडे, ठाणेसुमारे वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचे शासनाचे आदेश आहेत़ यामुळे ठाणे जिल्हा परिषदेच्या ३१६ तर पालघर जि.प.च्या सुमारे २६४ आदी सुमारे ५८० प्राथमिक शाळा बंद करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत़विभाजनानंतर ठाणे जिल्ह्यात जि.प.च्या १७०० शाळा राहिल्या आहेत़ त्यातील ३१६ शाळा बंद होऊ शकतात. पालघर जिल्ह्याच्या आदिवासी, दुर्गम भागांत सुमारे १८५५ शाळा आहेत. यापैकी २६४ शाळांची पटसंख्या कमी असल्यामुळे त्या कोणत्याही क्षणी बंद होऊ शकतात़ बहुतांशी आदिवासी कुटुंबे पाल्यांसह गावपाडे सोडून कामासाठी अन्यत्र स्थलांतर करतात. यामुळे शाळेत बहुधा विद्यार्थी नसतातच. यानुसार ठाणे, पालघर जिल्ह्यांतील सुमारे ५८० शाळा कोणत्याही क्षणी कायमस्वरूपी बंद होण्याचे संकेत आहेत. ‘शिक्षणाचा हक्क ’ (आरटीई) कायद्यानुसार आता सातवीपर्यंतच्या शाळांना आठवीचा वर्ग जोडण्यात आला आहे. या ३१६ प्राथमिक शाळा विद्यार्थी संख्येअभावी बंद पडणार आहेत. जि.प.च्या कार्यक्षेत्रातील शहापूर, मुरबाड, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ या तालुक्यांतील शाळांचा यामध्ये समावेश आहे. सर्वाधिक शाळा शहापूर व मुरबाड तालुक्यांतील आदिवासी, दुर्गम भागांतील आहेत. पालघरच्या जव्हार, तलासरी, वाडा, मोखाडा, विक्रमगड, डहाणू तालुक्यांतील दुर्गम भागातील शाळा पटसंख्येअभावी बंद होऊ शकतात़याप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक शाळांमधील १७० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरले आहेत. यामध्ये ८३ शिक्षकांसह ४२ लिपीक व ४५ शिपायांचा समावेश आहे. जि.प. व तहसीलदार कार्यालयांच्या विविध विभागांमध्ये ते सध्या कार्यरत आहेत.
५८० प्राथमिक शाळा होणार बंद
By admin | Updated: February 15, 2015 23:11 IST