Join us

माजी मंत्री, आमदारांसह ५८ उमेदवारांना आज कौल

By admin | Updated: October 14, 2014 23:22 IST

नालासोपाऱ्यातील क्षितिज ठाकूर, शिरीष चव्हाण, तर डहाणूतील शंकर नम आणि विलास तरे आदी मान्यवरांचेही भवितव्य असेच बंदिस्त होणार आहे.

वसई /पालघर : १५ आॅगस्ट रोजी अस्तित्वात आलेल्या नव्या पालघर जिल्ह्यात होणारी ही पहिलीच विधानसभा निवडणूक असून वसईतील माजी आमदार व बविआचे सूत्रधार हितेंद्र ठाकूर विरुद्ध मावळते अपक्ष आणि शिवसेना पुरस्कृत आमदार विवेक पंडित व माजी आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित विरुद्ध माजी राज्यमंत्री व बविआच्या उमेदवार मनीषा निमकर या लढतीत कोण बाजी मारणार, याचा फैसला करणारे मतदान बुधवारी यंत्रांत बंदिस्त होणार आहे. नालासोपाऱ्यातील क्षितिज ठाकूर, शिरीष चव्हाण, तर डहाणूतील शंकर नम आणि विलास तरे आदी मान्यवरांचेही भवितव्य असेच बंदिस्त होणार आहे.अत्यंत शांततेने परंतु चुरशीने झालेला प्रचार, हे या वेळेचे वैशिष्ट्य होते. यंदा इतक्याजणांनी पक्षांतर केले की, उमेदवार तेच पण फक्त त्यांचे पक्ष आणि चिन्ह बदललेले अशी अवस्था या वेळी झाली आहे. शिवसेनेच्या माजी आमदार आणि राज्यमंत्री मनीषा निमकर या वेळी बविआकडून उभ्या आहेत, तर राष्ट्रवादीचे कृष्णा घोडा या वेळी शिवसेनेकडून नशीब आजमावित आहेत. राष्ट्रवादीचे शंकर नम या वेळी सेनेकडून डहाणूतून झुंज देत आहेत, तर वसईत विवेक पंडित यांनी अपक्ष राहणेच पसंत केले आहे. त्यांच्या या पक्षांतराला जनाधार आहे की नाही, हे आजच्या मतदानाने परंतु रविवारी स्पष्ट होणार आहे. विद्यमान आमदार क्षितिज ठाकूर, विवेक पंडित, विलास तरे, विष्णू सवरा, राजेंद्र गावित अशा पाच मावळत्या आमदारांचे भवितव्य या मतदानाने निश्चित होणार आहे. डहाणूमध्ये रामजी वरठा यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने उमेदवारी दिली नाही. तसेच त्यांच्या पुत्रालाही नाकारले . त्यामुळे त्यांचे पुत्र जगन्नाथ वरठा यांनी पालघरमधून मनसेची उमेदवारी घेतली आहे. विक्रमगडचे आमदार चिंतामण वनगा खासदार झाल्यामुळे या वेळी रिंगणात नाहीत. त्यांच्या जागी भिवंडी ग्रामीणमधले मावळते आमदार सवरा यांना भाजपाने रिंगणात उतरविले आहे. विशेष म्हणजे बहुजन विकास आघाडीने वसई नालासोपारा, बोईसर, पालघर, विक्रमगड, डहाणू अशा सहाही मतदारसंघांत प्रथमच आपले उमेदवार उभे केले आहेत. त्यांचाही फैसला मतदान यंत्रांद्वारे उद्या होणार आहे. या वेळी युतीही नाही आणि आघाडीही नाही, त्यामुळे अन्य जिल्ह्यांत पंचरंगी लढती असल्या तरी बविआच्या उमेदवारांमुळे या जिल्ह्यातील सहाही मतदारसंघांत षटरंगी लढती होणार आहेत. काही ठिकाणी राष्ष्ट्रवादीने बविआसाठी जागा सोडल्या असल्या तरी तिथे कुठे मार्क्सवादी तर कुठे बंडखोरांनी ती उणीव भरून काढली आहे. त्यांचेही भवितव्य उद्या मतपेटीत बंदिस्त होणार आहे. (विशेष प्रतिनिधी)