Join us

वजन न घटल्यामुळे महिलेला ५७ हजारांची नुकसानभरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 06:18 IST

वजन घटविण्याचे व अन्य सुविधा देण्याचे आश्वासन देऊन ते न पाळणा-या पेडर रोडच्या एका जिमला ग्राहक मंचाने चांगलाच दणका दिला.

मुंबई : वजन घटविण्याचे व अन्य सुविधा देण्याचे आश्वासन देऊन ते न पाळणा-या पेडर रोडच्या एका जिमला ग्राहक मंचाने चांगलाच दणका दिला. तक्रारदार महिलेला नुकसानभरपाई म्हणून एका महिन्यात ५७ हजार रुपये देण्याचा आदेश दिला आहे.भुलाभाई देसाई रोड येथे राहणाºया डिंपल दिवेचा यांनी पेडर रोडवरील गोल्ड जिममध्ये (ही जिम सध्या बंद आहे) ३२ हजार रुपये भरून प्रवेश घेतला. यामध्ये त्यांना दर आठवड्याला ७५० ग्रॅम वजन घटवले जाईल व रक्त चाचणी, सीबीजी, एफबीसी, थायरॉईटच्या चाचण्या करून देण्यात येतील, असे आश्वासन जिम चालकांनी दिले. तसेच फिजिओथेरिपिस्टही भेट देतील, असे सांगितले. जिमच्या आश्वासनामुळे दिवेचा यांनी १८ जून २०१३ रोजी जिमचे सदस्यत्व स्वीकारले.दिवेचा यांनी केलेल्या तक्रारीनुसार, ३२ हजार रुपये भरूनही जिमने समाधानकारक सेवा दिली नाही. तसेच अन्य सुविधाही उपलब्ध केल्या नाहीत. आॅगस्ट २०१३मध्ये त्यांना जिममध्ये बोलविण्यात आले. त्यांच्याकडून तीन आठवडे व्यायाम करून घेण्यात आला. मात्र, जिमने आश्वासन दिल्याप्रमाणे वजन कमी झाले नाही. एके दिवशी जिममध्ये शॉर्टसर्किट झाले आणि दुसºयाच दिवशी जिम बंद करण्यात आले. त्यानंतर दिवेचा यांनी जिम चालकांना ३२ हजार रुपये परत करण्यास सांगितले. त्यासाठी त्यांनी अनेक मेल पाठविले. मात्र, जिम चालकांनी त्यांना ३२ हजार रुपयांपैकी केवळ १९ हजार रुपये परत करण्यास तयारी दर्शवली. परंतु, जिमने दिलेले आश्वासन पाळले नाही म्हणून दिवेचा यांनी पैसे परत घेण्यास नकार देत ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली.>महिनाभरात पैसे देण्याचे आदेशग्राहक मंचासमोरील सुनावणीत जिमने दिवेचा यांनी केलेले आरोप फेटाळले. जिम बंद नाही. दिवेचा काही दिवस जिममध्ये आल्याने काही रक्कम कापून १९ हजार रुपये देऊ, असे जिम चालकांच्या वतीने वकिलांनी सांगितले. मात्र ग्राहक मंचाने जिमने सेवा पुरविण्यात कमी पडल्याचे मान्य करत गोल्ड जिमला दिवेचा यांनी सदस्यत्वासाठी भरलेले ३२ हजार रुपये नऊ टक्के व्याजासह देण्याचा तसेच मानसिक त्रासापोटी २० हजार रुपये, तक्रार करण्यासाठी आलेला खर्च म्हणून ५ हजार रुपये एका महिन्यात देण्याचा आदेश जिमला दिला.