कमलाकर कांबळे, नवी मुंबईशहरात स्वस्त व बजेटमधील घरांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. वाढलेल्या किमतीमुळे घर घेताना सर्वसामान्यांची परवड होत आहे. या पार्श्वभूमीवर पुढील सहा वर्षांत अल्प आणि मध्यम उत्पन्न गटांसाठी ५५ हजार सदनिका बांधण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय सिडकोने घेतला आहे. या प्रस्तावित गृहप्रकल्पांतील घरे स्वस्त दरात उपलब्ध करण्याचा सिडकोचा मानस आहे.सायबर सिटीत घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. मध्यंतरीच्या काळात खासगी विकासकांनी छोट्या आकाराची घरे बांधणे बंद केले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची परवड होत आहे. या पार्श्वभूमीवर सिडकोने पुन्हा गृहबांधणीच्या आपल्या मूळ धोरणावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार मागील साडेतीन वर्षांत शहराच्या विविध भागांत विविध घटकांसाठी पावणेनऊ हजार घरे बांधली आहेत. त्यापैकी अल्प आणि मध्यम उत्पन्न गटांसाठी साडेचार हजार घरे आहेत. गेल्या वर्षी खारघर येथील स्वप्नपूर्ती गृहप्रकल्पातील घरांवर सर्वसामान्यांच्या अक्षरश: उड्या पडल्या होत्या. ३१५४ घरांसाठी जवळपास ८७ हजार अर्ज सिडकोला प्राप्त झाले होते. तर प्रत्यक्षात दोन लाख अर्जांची विक्री झाली होती. यावरून स्वस्त व बजेटमधील छोट्या घरांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर अल्प व मध्यम उत्पन्न गटांसाठी येत्या सहा वर्षांत आणखी ५५ हजार घरे बांधण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यादृष्टीने प्राथमिक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. गृहप्रकल्पासाठी संभाव्य जागांची निवड, गृहप्रकल्पांचे स्वरूप, त्यातील घरांची रचना, सोयी-सुविधांचा आराखडा, घरांच्या किमती याबाबत चाचपणी सुरू करण्यात आल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी दिली.
सहा वर्षांत ५५ हजार सदनिका
By admin | Updated: June 23, 2015 23:17 IST