Join us

कुर्ल्यात भरदुपारी ५५ लाखांची लूट

By admin | Updated: May 24, 2015 01:02 IST

रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून सोन्याचे दागिने घेऊन जाणाऱ्या एका सराफाला लुटल्याची घटना शुक्रवारी दुपारी कुर्ल्यात घडली.

मुंबई : रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून सोन्याचे दागिने घेऊन जाणाऱ्या एका सराफाला लुटल्याची घटना शुक्रवारी दुपारी कुर्ल्यात घडली. भररस्त्यात घडलेल्या या घटनेत लुटारूंनी ५५ लाखांचा ऐवज लंपास केला असून याबाबत कुर्ला पोलीस तपास करत आहेत. भैरव जैन असे सोने व्यापाऱ्याचे नाव आहे. त्यांचा परळमध्ये सोने आणि चांदीचे दागिने तयार करण्याचा कारखाना आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबईभर फिरून दुकानदारांना ते आॅर्डरनुसार दागिने तयार करून पुरवतात. त्यानुसार काही सराफांना दागिन्यांचे नमुने दाखवण्यासाठी शुक्रवारी ते कुर्ला परिसरात आले होते. त्यानंतर दुपारी पुन्हा ते त्यांच्या गाडीने कारखान्याच्या दिशेने जात होते. याच दरम्यान कुर्ल्यातील एलबीएस मार्गावरील कचरा डेपोसमोर त्यांच्या गाडीसमोर एक दुचाकी आडवी आली. दुचाकीवर बसलेल्या एका लुटारूने जैन यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत त्यांची बॅग हिसकवण्याचा प्रयत्न केला. यावेळी जैन यांनी विरोध केला. मात्र लुटारूंनी त्यांना मारहाण करत बॅग हिसकावली आणि पसार झाले. या बॅगेत सुमारे ५५ लाखांचे दागिने होते, असा दावा जैन यांनी केला. कुर्ला पोलिसांनी दोन अनोळखी लुटारुंविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही चित्रण ताब्यात घेतले असून आरोपींचा शोध सुरू आहे.