पंकज रोडेकरल्ल ठाणेसहा ते १४ वयोगटांतील शाळाबाह्यबालकांचा शोध घेण्यासाठी शनिवारी राज्य सरकारने राबविलेल्या मोहिमेंतर्गत ठाणे जिल्ह्यात पाच हजार ४२३ बालके शाळाबाह्यअसल्याचे समोर आले आहे. यातील चार हजार ४३४ मुले ही सहा महापालिका क्षेत्रांतील असून ग्रामीण भागात ९८९ मुले आहेत. कधीच शाळेची पायरी न चढणाऱ्यांची संख्या दोन हजारांहून अधिक आहे. तर मध्येच शाळा सोडलेल्यांची संख्या एक हजार ६०० हून अधिक आहे. मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) कायद्यानुसार प्रत्येक बालकाला शिक्षणाचा हक्क आहे. तरीही हजारो मुले शाळे बाहेरच आहेत. त्यात विविध पातळ्यांवर अशा मुलांच्या संख्येविषयी संभ्रम आहे. शाळाबाह्य मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शनिवारी २१ हजार २४९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घरोघर जाऊन ही मोहीम राबविली. सर्वेक्षण काय सांगतेमुलामुलींचा विचार केल्यास कधीच शाळेची पायरी न चढण्यामध्ये ग्रामीण भागात मुलेच अधिक आहेत. तर मध्ये शाळा सोडणाऱ्यांमध्ये मुलींचे प्रमाण अधिक आहे. शहरी भागात मात्र पायरी न चढणारे आणि मध्येच शाळा सोडणाऱ्यांमध्ये मुलांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते.
जिल्ह्यात एकूण १९२९ शाळा असून यामध्ये ग्रामीण भागात १२२६ तर मनपा क्षेत्रात ७०३ शाळा आहेत.
जिल्ह्यात सर्वेक्षण केलेली एकूण सात लाख २९ हजार ६५४ कुटुंब संख्या आहे. ग्रामीण भागातील एक लाख ४ हजार ३० तर शहरात सहा लाख २५ हजार ६२४ कुटुंबांचा समावेश आहे.